भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने इंग्लंड विरुद्ध झंझावात कायम ठेवत मोठा विक्रम केला आहे. केएलने मँचेस्टरमधील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याला मागे टाकलं आहे. केएल या मालिकेत सुरुवातीपासून सातत्याने धावा करतोय. केएलने चौथ्या कसोटीतही निर्णायक खेळी करत कमाल केली. मात्र केएल दुर्देवी ठरला. केएलचं शतक अवघ्या काही धावांनी हुकलं.
टीम इंडियाने इंग्लंडला चौथ्या दिवशी 669 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर भारताने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावल्या. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर केएल राहुल आणि शुबमन गिल या दोघांनी डाव सावरला. दोघेही चौथ्या दिवशी नाबाद परतले. मात्र पाचव्या दिवशी या दोघांना या भागीदारीत जास्त धावा जोडता आल्या नाहीत. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने केएल-शुबमन ही जोडी फोडली.
स्टोक्सने केएल राहुल याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. केएलचं यासह इंग्लंड विरूद्ध कसोटी मालिकेत तिसरं शतक हुकलं. केएलने 230 चेंडूत 8 चौकारांसह 90 धावा केल्या. केएलची कसोटी कारकीर्दीत 90 धावांवर बाद होण्याची दुसरी वेळ ठरली. केएल याआधी 2017 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 90 धावांवर बाद झाला होता.
केएल शतक तर करु शकला नाही. मात्र केएलने सेना देशात (साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) वीरेंद्र सेहवाग याला सर्वाधिक धावा करण्याबाबत पछाडलं. केएलच्या नावावर आता सेना देशात ओपनर म्हणून 48 डावात 1 हजार 782 धावा झाल्या आहेत. केएलने या दरम्यान 6 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत. सेहवागने 1 हजार 574 धावा केल्या होत्या. भारतासाठी सेना देशात ओपनर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. गावसकर यांनी 57 डावात 2 हजार 464 धावा केल्या होत्या. गावसकरांनी या दरम्यान 8 शतकं आणि 11 अर्धशतकं झळकावली होती.
दरम्यान केएल आणि शुबमन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. केएलने या दरम्यान इंग्लंड विरूद्धच्या या मालिकेत 500 धावा पूर्ण केल्या. केएलच्या नावावर आता या मालिकेतील 8 डावात 510 धावा झाल्या आहेत.