रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या ऑलराउंडर जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागादारी करत इंग्लंडची 311 धावांची आघाडी मोडीत काढली आहे. टीम इंडियाने यासह दुसऱ्या डावात आघाडी घेतली आहे. भारताने मँचेस्टरमध्ये चौथ्या कसोटीतील पाचव्या आणि अंतिम दिवशी चहापानापर्यंत 118 ओव्हरमध्ये 322 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने अशाप्रकारे 11 धावांची आघाडी घेत इंग्लंडला विजयापासून दूर केलं आहे. तसेच इंग्लंडचा आता डावाने विजय होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. चौथ्या दिवशी भारताच्या निराशाजनक सुरुवातीमुळे डावाने पराभव होण्याची चिन्हं होती. मात्र कर्णधार शुबमन गिल याचं शतक तसेच केएल राहुल, जडेजा आणि सुंदर या त्रिकुटाच्या अर्धशतकामुळे भारताने आपला पराभव टाळला आहे. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहणार, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
इंग्लंडने जो रुट आणि कर्णधार बेन स्टोक्स याच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 669 धावा करत 311 ची आघाडी घेतली. त्यानंतर चौथ्या दिवशी इंग्लंडने भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. त्यामुळे 2 आऊट अशी 0 अशी स्थिती झाली. मात्र कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल या जोडीने भारताला सावरलं. ही जोडी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिली. पाचव्या दिवशी बेन स्टोक्स याने ही जोडी फोडली. शुबमन-केएलने तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. केएलने 90 धावा केल्या.
केएलनंतर वॉशिंग्टन मैदानात आला. शुबमन आणि वॉशिने भारताचा डाव पुढे नेला. या दरम्यान शुबमनने शतक ठोकलं. मात्र त्यानंतर शुबमन आऊट झाला. शुबमनने 103 धावा केल्या. भारताने 222 धावांवर चौथी विकेट गमावली. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने सार्थपणे भारताला सावरलं. या दोघांनी टी ब्रेकपर्यंत नॉट आऊट 100 रन्सची पार्टनरशीप केली. दोघांनी या दरम्यान वैयक्तिक अर्धशतकं झळकावली आणि इंग्लंडची आघाडी मोडीत काढली.
जडेजा-वॉशिंग्टनची सुंदर भागीदारी
जडेजाने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 27 वं तर इंग्लंड विरुद्ध या मालिकेतील पाचवं अर्धशतक झळकावलं. तर सुंदरने पाचवं कसोटी अर्धशतक ठोकलं. टी ब्रेकपर्यंत वॉशिंग्टन सुंदर याने 139 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या. तर रवींद्र जडेजा 102 बॉलवर 53 रन्सवर नॉट आऊट परतला.