‘माझी जात आडवी आली म्हणून मंत्रिपद मिळालं नाही’, राष्ट्रवादीचा बडा नेता अजितदादांवर नाराज
GH News July 27, 2025 10:08 PM

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंडेंना संधी दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे. या सर्व प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात.

बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिला आहे का?

बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यात 45 वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही हे दुर्दैव आहे. बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचे काम पक्षाने मागच्या काही वर्षांमध्ये केलं आहे. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिला आहे का? असा सवालही सोळंके यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठींबा दिला

पुढे बोलताना सोळंके म्हणाले की, ‘बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा राहिला आहे. गेल्या अनेक निवडणुकीत केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठींबा दिला. मात्र, मंत्रिपद देताना शरद पवारांपासून ते आता अजित पवारांपर्यंत प्रत्येकाने ओबीसीला संधी दिली. मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितले नाही.’

मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते

तुम्हाला मंत्रिपद का मिळत नाही यावर बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की, मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते असं मला वाटतं. मी ओबीसीमध्ये जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती असंही सोळंके यांनी म्हटलं आहे. तसेच आमदार धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री करावं, किंवा राज्य पातळीवरील मोठ पद द्या, त्यांना संधी मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत असंही सोळंके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रकाश सोळंके यांच्या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. अजित पवार म्हणाले की, मंगळवारी मुंबईत पक्षातील आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यावेळी सोळंके यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यावेळी त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण जाणून घेणार आहे.’त्यामुळे आता अजित पवार आणि प्रकाश सोळंके यांच्यात नेमकं काय बोलणं होणार आणि त्याचे परिणाम काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.