Nandurbar : कंत्राटदारांचे १२ हजार ५०० कोटींची बिले प्रलंबित; नंदुरबारमधील ठेकेदार आक्रमक
Saam TV July 27, 2025 07:45 PM

सागर निकवाडे 

नंदुरबार : प्रशासनातील वेगवेगळ्या विभागांतर्गत निविदा काढून कंत्राटदाराला कामे दिली जात असतात. कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार बिल सादर करत असतात. मात्र मागील काही महिन्यांपासून या कंत्राटदारांना कामांचे बिल मिळालेले नाहीत. साधारण १२ हजार ५०० कोटी रुपयांचे बिले प्रलंबित असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात आहे. बिले मिळत नसल्याने कंत्राटदार आक्रमक झाले आहेत. 

नंदुरबारजिल्ह्यातील शासकीय ठेकेदार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, जलजीवन मिशन, ग्रामविकास, नगर विकास, जलसंधारण विभाग आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत काढलेल्या कामांची जवळपास १२,५०० कोटी रुपयांची देयके जून २०२५ अखेरपर्यंत प्रलंबित आहेत. शासनाने मोठ्या प्रमाणावर कामे काढली असली तरी, त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध न केल्याने ठेकेदार मेटाकुटीला आले आहेत.

Kolhapur Accident : बसची वाट पाहत उभ्या मुलींच्या घोळक्यात भरधाव कार घुसली; विद्यार्थिनीचा मृत्यू, ५ जण जखमी

व्यवसाय ठप्प होण्याची भीती 

गेल्या अनेक महिन्यांपासून ठेकेदारांना कुठलेही देयक मिळालेले नाहीत. यामुळे ठेकेदार देखील अडचणीत सापडले आहेत. बिल मिळत नसल्याने मजूर, तांत्रिक कर्मचारी, पुरवठादार, पेट्रोल पंप चालक आणि बँकांचे कर्जदार या सर्वांवर परिणाम झाला आहे. या आर्थिक अडचणीमुळे व्यवसाय ठप्प होण्याची भीती असून, अनेक उद्योगांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. 

Washim News : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, १९ जणांवर गुन्हा दाखल

कामबंद आंदोलनाचा इशारा 

नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रक्टर्स वेलफेअर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निधी त्वरित उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, जर निधी लवकर मिळाला नाही तर सर्व विकासकामे थांबतील आणि ठेकेदारांना साखळी उपोषण व कामबंद आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यामुळे भविष्यात ठेकेदारांच्या आत्महत्यांसारख्या गंभीर घटनांची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.