अभिनेते चंकी पांडे यांचा भाऊ चिक्की पांडेंचा मुलगा अहान पांडेनं ‘सैय्यारा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करिअरमधल्या पहिल्यावहिल्या चित्रपटातूनच अहानने विशेष छाप सोडली आहे. 18 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम रचले आहेत. आता ‘सैय्यारा’ने रोमान्सचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानलाही मागे टाकलं आहे. शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटाचा विक्रम अहान पांडे आणि अनित पड्डाच्या चित्रपटाने मोडला आहे.
Sacnilk ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी तब्बल 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दहाव्या दिवसाच्या कलेक्शनचे अधिकृत आकडे अद्याप समोर आले नाहीत. परंतु जर हा आकडा 30 कोटींचाच असेल तर आतापर्यंत या चित्रपटाने 247.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटाने 227 कोटी रुपये कमावले होते. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोणने मुख्य भूमिका साकारली होती. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाला ‘सैय्यारा’ने अवघ्या काही दिवसांत मागे टाकलं आहे.
‘सैय्यारा’च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 21 कोटी रुपयांची बंपर कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. ‘सैय्यारा’ने दुसऱ्या दिवशी 26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 35.75 कोटी रुपये कमावले होते. तर चौथ्या दिवशी 24 कोटी रुपयांची कमाई झाली होती.
‘सैय्यारा’ची जबरदस्त कमाईपहिला दिवस- 21 कोटी रुपये
दुसरा दिवस- 26 कोटी रुपये
तिसरा दिवस- 35.75 कोटी रुपये
चौथा दिवस- 24 कोटी रुपये
पाचवा दिवस- 25 कोटी रुपये
सहावा दिवस- 21.5 कोटी रुपये
सातवा दिवस- 19 कोटी रुपये
आठवा दिवस – 18 कोटी रुपये
नववा दिवस- 26.5 कोटी रुपये
अशा प्रकारे पहिल्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 172.75 कोटी रुपयांवर पोहोचला होता. ‘सैय्यारा’ची निर्मिती YRF ने केली असून मोहित सुरीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये विशेष क्रेझ पहायला मिळतेय. हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्समध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे त्याचा चांगला परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही होत आहे. सोशल मीडियावरही सध्या ‘सैय्यारा’चीच चर्चा आहे. या चित्रपटाचे रील्स, व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. एखाद्या गोष्टीची अधिकाधिक चर्चा होऊ लागली की साहजिकच त्याविषयी कुतूहल निर्माण होतं. हेच कुतूहल आणि माऊथ पब्लिसिटी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून घेऊन येत आहे.