शेजारील देश चीनची राजधानी बीजिंगमध्ये पावसाने हाहाःकार घातला. बीजिंगच्या उत्तरी भागात अनेक दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसात तर पावसाचा कहर दिसून आला. यामध्ये 30 नागरिकांना जीव मुकावा लागला. चीनच्या माध्यमांनुसार, राजधानीतील 80 हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. अनेक रस्ते खरडून निघाले आहे. बीजिंग शेजारील 136 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर बेपत्ता लोकांचा आकडा अजूनही हाती आलेला नाही. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि लष्कर त्यांचा शोध घेत आहे. अनेक जण पुरात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थलांतरीत लोकांना आश्रय आणि त्यांची भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षातील राजधानीला बसलेला हा मोठा फटका मानण्यात येत आहे.
या दोन जिल्ह्यांना मोठा फटका
सरकारी दुरदर्शन वाहिनी सीसीटीव्हीने मंगळवारी बीजिंगजवळील दोन जिल्ह्यांना पूराचा मोठा फटका बसल्याचे वृत्त दिले आहे. मियुन आणि यानकिंग हे दोन्ही जिल्हे बीजिंग शहराच्या प्रशासकीय विभागात येतात. या जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. मियुन जिल्ह्यात 28 तर यानकिंग 2 मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. बीजिंगमध्ये काल रात्री मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. सोमवारी आलेल्या पुरात येथील चार लोकांना प्राण गमवावे लागले. अनेक सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरले. त्यासोबत गाळानेही अनेक वाहनं रुतली. हेबेई प्रदेशात जमीन खसल्याने काही जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच वादळी वाऱ्याने कहर केला आहे. या सर्व आपत्तीत आतापर्यंत 34 जणांना प्राण गमवावे लागल्याची माहिती समोर येत आहे. तर बेपत्तांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. बचाव आणि मदतीत मुसळधार पावसामुळे अडथळे येत आहे.
मैदानांचे झाले तळे, कार वाहून गेल्या
मियुन जिल्ह्यातील अनेक मैदानं आणि मॉलसमोरील मोकळ्या जागा आता तलाव झाल्या आहेत. पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पाण्याचा निचारा होत नाही. त्यामुळे या मैदानात पाणी साचले आहे. शिन्हुआ या वृत्तसेवा संस्थेनुसार, अनेक भागात कार वाहून गेल्या आहेत. वीजेची खांब आडवी झाली आहेत. वीज पुरवठा खंडीत आहे. झाडं उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाली आहेत. या गंभीर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. पण मुसळधार पावसाने मदत कार्यात मोठे अडथळे येत आहेत. स्वतः पंतप्रधान ली कियांग हे जातीने मदत कार्यात लक्ष ठेऊन आहेत.