सनातन धर्मात नागपंचमीला खूप महत्त्व दिले जाते. या दिवशी लोक नाग देवतेची पूजा करतात आणि आनंदी जीवनासाठी नागदेवतेकडे मनोभावे प्रार्थना करतात. वेद आणि पुराणांमध्ये नाग आणि सापांचा उल्लेख आहे. आपण भगवान शिवाच्या गळ्यात, हातांमध्ये आणि कमरेभोवती नाग, साप गुंडाळलेले पाहतो.
भारतीय संस्कृतीत नागदेवतेला आणि सापांना पूज्य मानले जाते. देशात नाग देवतेला समर्पित अनेक मंदिरे आहेत जिथे त्यांची पूजा केली जाते. भारतातही असं नाग देवतेच्या सर्वात मोठं मंदिर आहे. जिथं एक लाखाहून अधिक नाग अन् सापांच्या मूर्त्या आहेत.
देशात केरळमध्ये मन्नारसाला येथ मोठं नागदेवतेचं मंदिर आहे. हे सर्वात मोठे मंदिर मानले जाते. केरळच्या हरिपद जंगलात असलेल्या मन्नारसाला मंदिराचा इतिहास केरळचे निर्माते मानले जाणारे भगवान विष्णूचे सहावे अवतार भगवान परशुराम यांच्याशी संबंधित आहे.
भगवान परशुरामांनी केरळची भूमी ब्राह्मणांना दान केल्याच्या कथा आहेत. परंतु येथे अनेक विषारी साप होते ज्यामुळे लोकांचे राहणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत त्यांनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली.
यानंतर, भगवान शिव यांनी परशुरामांना सापांचा राजा नागराजची पूजा करण्याचा सल्ला दिला जेणेकरून सापांचे विष मातीत पसरेल आणि ती सुपीक होईल.
परशुरामांनी मन्नारसाला येथे नागराजाची मूर्ती स्थापित केली आणि विधींसाठी एका ब्राह्मण कुटुंबाची व्यवस्था केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याच कुटुंबातील लोक मंदिरात पूजा करत आहेत. त्यांना इल्लम म्हणून ओळखले जाते.
केरळचं मन्नारसाला हे मंदिर खूप चमत्कारिक असल्याचे म्हटले जाते, विशेषतः ज्यांना मुले होत नाहीत ते जोडपी येथे येतात आणि मूल होण्यासाठी नवस करतात.
असे सांगितले जाते की, ज्यांचा नवस पूर्ण होतो, इच्छा पूर्ण होते त्यांना या मंदिरात पुन्हा येऊन नवस फेडावा लागतो. यावेळी त्यांना नाग, सापाच्या मूर्ती अर्पण कराव्या लागतात.