त्या रेव्ह पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन, पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी 'सामना'तून मोठी पोलखोल
Tv9 Marathi July 29, 2025 04:45 PM

पुण्यातील खराडी येथे एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली आहे. या पार्टीमध्ये गांजासदृश आणि इतर नशा आणणारे पदार्थ सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, ठाकरे गटाने या प्रकरणावरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप हीच एक रेव्ह पार्टी बनली आहे आणि या रेव्ह पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत, असा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावर भाष्य करण्यात आले. “भाजप हीच एक रेव्ह पार्टी बनली आहे आणि या रेव्ह पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत,” असा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांना गिरीश महाजन गोत्यात आणू शकतात, कारण त्यांच्या डोक्यात सत्तेचे, पैशांचे आणि अनैतिकतेचे बेफाम वारे शिरले आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

पुण्याची संस्कृती पूर्णपणे बिघडली

पुण्याला एकेकाळी संस्कार, संस्कृती आणि नैतिकतेचे शहर मानले जात होते, पण आता ते उलटे घडत आहे. कोयता गँग, रेव्ह पार्ट्या, बारमधील धिंगाणा आणि भररस्त्यावरची गुंडागर्दी यामुळे पुण्याची संस्कृती पूर्णपणे बिघडली आहे. प्रांजल खेवलकर यांच्या अटकेमागे राजकीय सूड असल्याची शंका ‘सामना’ने व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे हनी ट्रॅप प्रकरणावरून गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्ला करत असतानाच, त्यांच्या जावयाला पकडल्याने हे प्रकरण लक्ष विचलित करण्यासाठी आणि खडसे यांना धडा शिकवण्यासाठी घडवून आणले असावे, असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

कोणतेही महत्त्वाचे खाते दिले नाही

हनी ट्रॅपसारख्या गंभीर प्रकरणावरील लक्ष उडविण्यासाठी व खडसे यांना धडा शिकविण्यासाठीच हे नवे प्रकरण घडवले काय? अशी शंका घेण्यास त्यामुळे जागा आहे. गिरीश महाजन हा एक पाताळयंत्री व राक्षसी महत्त्वाकांक्षेचा माणूस आहे. महाजन यांच्या सर्व करामती अमित शहांना माहीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात महाजन यांना घेऊ नये, असे शहांचे म्हणणे होते. पण हे असले उद्योग करण्यासाठी फडणवीस यांना महाजनांसारखे लोक लागतात. त्यामुळे फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले, पण त्यांना कोणतेही महत्त्वाचे खाते दिले नाही, अशी टीकाही सामनातून करण्यात आली.

म्हणून महाजनसारख्यांचे राजकारण टिकले

स्वतः खडसे यांना मंत्रिमंडळातून नैतिकतेच्या मुद्द्यावरून जावे लागले. भोसरीचे जमीन प्रकरण त्यासाठी उभे केले गेले, पण फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज जे लोक बसले आहेत, त्यांच्या बाबतीत काय मोठी नैतिकता ओसंडून वाहत आहे? भाजपमध्ये ज्या प्रकारचे लोक आले त्यांचे उद्योग पाहता महाराष्ट्राच्या नैतिकतेची ऐशी की तैशीच झाली आहे. गिरीश महाजन यांच्या कारनाम्यांविषयी काय श्री. फडणवीस यांना माहीत नाही? पोलिसांचा मस्तवाल वापर करून त्यांचे राजकारण सुरू आहे. हाताशी पोलीस आहेत म्हणून महाजनसारख्यांचे राजकारण टिकले आहे, असा आरोपही सामनातून करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.