Maharashtra Politics Live : राज ठाकरे करणार शेकापच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
Sarkarnama July 29, 2025 10:45 PM
Maharashtra Politics Live : राज ठाकरे करणार शेकापच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापनदिन सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सहभागी होणार आहेत. ते शेकापच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नुकतेच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले होते.

Maharashtra Politics Live : दौंडमध्ये भाजपला धक्का; बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर

शहराध्यक्षपदावरून पायउतार झालेले भाजप नेते स्वप्निल शाह हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. शहर भाजपमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कलहातून हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. शहा यांनी नुकतीच शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे.

Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटे यांची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी, माध्यमांना टाळले...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मंत्री माणिकराव कोकाटे यांची सुरू असलेली बैठक संपली असून, त्यात काय झालं, यावर भाष्य करण्याचे मंत्री कोकाटे यांनी टाळले. दरम्यान, मंत्री कोकाटे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर काय निर्णय होणार, हे अद्याप समोर आलेलं नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील आणि मंत्री कोकाटे यांच्यावरील निर्णय जाहीर करतील.

Manikrao Kokate : वादग्रस्त माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली; अजितदादांबरोबर बैठक सुरूच

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात गेल्या अर्धा तासांपासून चर्चा सुरू आहे. यात त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना, भविष्यात अशी विधान करणार नसल्याची ग्वाही दिली. मंत्री कोकाटे यांच्या या दिलगिरीवर अजितदादा काय निर्णय घेणार, याचा उत्सुकता वाढली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार की, नाही होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Vijaykumar Ghatage : अजितदादांनी आम्हाला शब्द दिलाय, निर्णय झाला पाहिजे; मंत्री कोकाटेंवरील कारवाईसाठी 'छावा'ची प्रतिक्रिया

'आम्ही व्यक्तीविरोधात नाही. प्रवृत्ती विरोधात आहोत. माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेळत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्री कोकाटे किती असंवेदनशील आहेत, हे दिसते. अजितदादांनी त्यांचे खातं काढून माणिकरावांना द्यावं. त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसावं, याला आमचा विरोध नाही. परंतु शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या खात्यावर संवेदनशील व्यक्ती असावी, एवढी अपेक्षा आहे. अजितदादांनी आम्हाला तसा शब्द आहे. त्यामुळे निर्णयाकडे लक्ष आहे. निर्णय झाला नाही, तर आम्ही राज्यभरात अजितदादांना फिरू देणार नाही', असा इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दिला.

Ajit Pawar Mumbai : मंत्री कोकाटेंपाठोपाठ मंत्री भुजबळ अजितदादांच्या भेटीसाठी पोचले; मुख्यमंत्री फडणवीस देखील मंत्रालयात दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मंत्रालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोचले आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर अजितदादा काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Ajit Pawar : 'कितीदा चुकणार, कितीवेळा माफ करणार'; अजित पवारांकडून कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर सूचक संकेत

'कितीदा चुकणार, कितीवेळा माफ करणार. सतत चुका करत असल्याने, किती वेळा माफ करायचे', असा सवाल अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे संकेत दिले. नाशिकमधील शेतकरी संघटनेने मंत्री कोकाटे यांची बाजू घेत, अजितदादांची भेट घेतली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका, अशी मागणी या शेतकरी संघटनांनी अजितदादांकडे केली. त्यावर अजित पवार यांनी हे विधान केले. मंत्रिपद देताना आम्ही निर्णय घेतला होता. त्यावेळी तुम्ही आले नव्हता. आता राजीनामा घेत आहोत, तर आला, असेही अजित पवार यांनी शेतकरी संघटनेला म्हटले.

Dharashiv Update : राजन साळवी यांच्या बैठकीमध्ये शिवसैनिकांचा राडा; सावंत समर्थकांची घोषणाबाजी

धाराशिव मधील शिवसेनेचे राज्य समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकीत राडा झाला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बॅनरवरील फोटो हटवल्यानंतर नाराज झालेल्या सावंत समर्थकांनी साळवी यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. तानाजी सावंत जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांचा बॅनर वर का फोटो नाही? असा सवाल करत कार्यकर्त्यांनी साळवी यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली.

Ajit Pawar And Manikrao Kokate : अजितदादांच्या भेटीला पोचले कृषिमंत्री कोकाटे; मंत्रिपदाचा फैसला होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पदाचा आज फैसला होणार आहे. पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई मंत्रालयात त्यांनी भेट घेतली. अजितदादांच्या दालनात मंत्री कोकाटे आता भेटीला पोचले असून, तिथं काय चर्चा होते, अन् काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

Pune Rave Party : माझ्यावर पाळत ठेवली जात आहे; एकनाथ खडसेंचा दावा

पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची कारवाई म्हणजे, निव्वळ बदनामी करण्याचे कटकारस्थान आहे. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहे. प्रांजल खेवलकर याने मद्य घेतल्याचा रिपोर्ट आला, मग ड्रग्स घेतल्याचा का आला नाही. वैद्यकीय अहवाल माध्यमांमध्ये कसा आला. महिलेकडे ड्रग्स सापडले असून,तिला पहिले आरोपी का करण्यात आले. तिथं प्रांजल खेवलकर याला पहिलं आरोपी केलं. त्याला मुख्य आरोपी करण्याचं कारण काय? मोबाईलमधील फोटो बाहेर कसे आले. पोलिस कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करत आहेत. रेव्ह पार्टीची व्याख्या काय ते पोलिसांनी सांगावी. सत्य काय ते बाहेर येईलच, असे सांगताना माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.

Operation Sindoor News: 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज ऑपरेशन सिंदूरसंदर्भात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी काँग्रेसला सुमारे दोन तासांचा वेळ देण्यात आला आहे. विरोधी पक्षाकडून चर्चेला सुरुवात करण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश प्रसाद सिंह, रेणुका चौधरी, रजनी पाटील हे इतर संभाव्य वक्ते सहभागी होणार आहे.

Rohit Pawar live: रोहित पवार घेणार मुंडे- देशमुख कुटुंबीयांची भेट

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते मुंडे कुटुंबीयांची परळीत तर देशमुख कुटुंबियांची केजमध्ये भेट घेणार आहेत.

Nimisha Priya: निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द

यमनमधील केरळची नर्स निमिषा प्रिया हिला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. या वृत्ताला ग्रँड मुफ्ती कार्यालयाने पुष्टी दिली आहे. निमिषा ही सध्या यमनची राजधानी सना येथील कारागृहात आहे.

Uddhav Thackeray Live: भेट किती वाजता होणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत. राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर भेटीचे नियोजन आहे, पण भेट किती वाजता होणार, याची माहिती अद्याप समजलेली नाही.

Pune rave party: डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह ६ जणांना आज पुन्हा न्यायालयात हजर करणार

पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेले एकनाथ खडसे यांचे जावाई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह ६ जणांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ६ जणांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात पुन्हा हजर करणार येणार आहे. त्यांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ होणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार हे दुपारी समजेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.