श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सण-उत्सवाला विशेष आणि वेगळे महत्त्व असते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. आज मंगळवारी २९ जुलै रोजी नागपंचमी साजरी केली जात आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित करण्यात येतो. श्रावण महिन्यात नाग हे महादेवांच्या महत्त्वाच्या प्रतीकांपैकी एक आहे. त्यामुळेच नागपंचमीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे.
नागपंचमीच्या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करुन नागदेवतेला प्रसन्न केले जाते. अशी मान्यता आहे की, श्रावण शुद्ध पंचमीला भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला होता. त्यानंतर यमुना नदीतून सुरक्षित बाहेर आले होते. म्हणूनच हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. शेतीत नागाचे महत्त्व अनमोल आहे, म्हणूनच सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. नागपंचमीच्या दिवशी अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या आठ प्रमुख नागांची पूजा केली जाते.
नागपंचमीला तवा, चाकू का वापरत नाहीत?नागपंचमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये भाकरी किंवा चपाती बनवली जात नाही. तसेच कढईत अन्न शिजवणेही टाळले जाते. यामागे एक विशिष्ट मान्यता आहे. पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाच्या फण्यासारखा दिसतो असे मानले जाते. त्यामुळे, या पवित्र दिवशी सापांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या उद्देशाने तवा, सुई, चाकू यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर करणे अशुभ मानले जाते. या दिवशी जमिनीची नांगरणी करणे देखील टाळले जाते. कारण जमिनीखाली सापांची बिळे असतात. उत्खनन केल्याने ती तुटण्याची भीती असते, ज्यामुळे सापांना इजा पोहोचू शकते.
नागपंचमीची आख्यायिकाया परंपरेमागे एक कथा प्रचलित आहे. एका गावात एक शेतकरी कुटुंब राहत होते. एकदा शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असताना, त्याच्या नांगराचा फाळ चुकून एका नागाच्या बिळात घुसला. यामुळे बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून प्रचंड राग आला. त्या क्रोधात तिने त्या शेतकऱ्याला, त्याच्या बायकोला आणि मुलांसह दंश करून ठार केले. त्या शेतकऱ्याची एक विवाहित मुलगी होती. नागिणीने तिला देखील दंश करून मारण्यासाठी तिच्या गावी, तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची मनोभावे पूजा करण्यात मग्न होती. तिने अत्यंत भक्तीपूर्वक पूजा केली आणि दूध-लाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखवला. तिची भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. तिने स्वतः ते दूध प्यायले. त्या मुलीवर प्रसन्न होऊन नागिणीने तिच्या आई-वडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले. त्यामुळे या दिवशी कोणतीही धारदार वस्तू वापरणे किंवा जमिनीचे खोदकाम करणे टाळले जाते, जेणेकरून कोणत्याही जिवाला, विशेषतः नागांना, इजा होऊ नये.