संदीप सोनार ः सकाळ वृत्तसेवा
काळेवाडी, ता. २९ : जुन्या काळातील वस्तूंचा संग्रह करण्याकडे छंदिष्टांचा कल असतो. त्यापैकीच एक म्हणजे ‘विंटेज’ मोटारी आणि वाहने. नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन त्या आता नव्या रुपात तयार केल्या जात आहेत. लग्नसमारंभ, प्री-वेडिंग, विविध इव्हेंट, चित्रपट यासाठी ‘विंटेज’ वाहनांची ‘क्रेझ’ वाढली असून यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येत आहे.
जुन्या काळातील राजे-महाराजे, श्रीमंत व्यापारी, उद्योजक आणि ब्रिटीशकालीन वस्तू आठवणींच्या स्वरुपात जपण्याचा छंद अनेक छंदिष्ट जोपासत असतात. त्यापैकीच एक म्हणजे मोटार सायकली व मोटारी. त्यांचे तंत्रज्ञान अतिशय झपाट्याने बदलले. काही छंदिष्ट ‘विंटेज’ मोटरसायकली आणि मोटारींची आवड पिंपरी चिंचवड शहरात टिकवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे.
मयूर जुनवणे यांची ‘विंटेज’ मोटार हे आकर्षण ठरत आहे. ब्रिटनमध्ये निर्मित वाहनासारखी परंतु पर्यावरणपूरक
अर्थात बॅटरीवर चालणारी जुनी चारचाकी मोटार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर अतुल क्षीरसागर यांनी जुन्या मोटरसायकलला नवे रुप देत जुन्या काळातील आठवणी ताज्या ठेवल्या आहेत.
उत्पनाचेही साधन
तासाप्रमाणे भाडे आकारुन ‘विंटेज’ वाहने ही उत्पन्न देण्याचे साधन बनली आहेत. लग्न समारंभात नवरदेव व नवरीचे आगमन असो की एखाद्या जुन्या मोटरसायकलवर नवरदेवाने नवरीला घेऊन येणे, अशा प्रकारचे इव्हेंट आधुनिक काळातील एक नाविन्य ठरू पाहत आहे. काही श्रीमंत आणि हौशी लोक पंजाब, हरियाणा तसेच इतर राज्यांतून ही वाहने बनवून शहरात आणत आहेत. त्यासाठी मोठी किंमत मोजायला देखील ते तयार असल्याचे दिसून येत आहे.
माझ्याकडील मोटार हे १९३१ मधील मॉडेल आहे. ती पाच लाख रुपयांत ‘सेकंड हॅन्ड’ घेतली. बॅटरीवर चालण्यासाठी तिच्यामध्ये सुधारणा केली आहे. मोटारीचा वेग ताशी ४० किलोमीटर असून पंजाब राज्यात बनविली आहे.
- मयूर जुनवणे, ‘विंटेज’ मोटार मालक
माझी मोटर सायकल ही ‘येझदी’ कंपनीची असून १९८१ मधील मॉडेल आहे. जुन्या चित्रपटात दोन्ही बाजूंनी सायलेन्सर असलेली व पिकप असलेली ही एकमेव मोटरसायकल होती. नव्याने दुरुस्तीसाठी मी तिच्यावर जवळपास एक लाख वीस हजार खर्च केला आहे. ती सुरळीत चालू असून नव्या मोटरसायकलींनाही मागे टाकते.
- अतुल माळी, मोटरसायकल मालक
PNE25V35360