- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
विज्ञान व वाणिज्य शाखांतील विद्यार्थ्यांमध्ये बारावीच्या कंपार्टमेंट (सप्लीमेंट्री) परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढ केवळ अपयशाचे प्रतीक नसून तयारीतील गोंधळ, शिक्षणपद्धतीतील त्रुटी आणि लेखन कौशल्याचा अभाव यांचेही द्योतक आहे.
स्पर्धा परीक्षा - प्रतिष्ठेचा भ्रम
बारावीनंतर अनेक कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षांचे गुण महत्त्वाचे असल्यामुळे काही विद्यार्थी बोर्ड परीक्षेला ‘हलक्यात’ घेतात. प्रवेश प्रक्रियेत स्पर्धा परीक्षेतील गुणांना प्राधान्य दिले जाते, परंतु बोर्ड परीक्षेतील किमान पात्रता आवश्यक असते. त्यामुळे बोर्डाकडे दुर्लक्ष केल्यास पात्रतेत अपयश येऊन संधी गमावण्याची शक्यता वाढते. शिवाय कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने, अनेक प्रवेश प्रक्रियेत त्याच वर्षात भाग घेता येत नाही.
अभ्यासक्रमातील विसंगती
स्पर्धा परीक्षा व बोर्ड परीक्षांचे अभ्यासक्रम वेगवेगळे असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. वेगवेगळ्या बोर्डांचे व स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक्रम भिन्न असल्यामुळे या गोंधळात आणखी भर पडते. बारावीच्या विद्यार्थ्यांना JEE, NEET, MHT-CET, NDA, DAT, IPMAT, CLAT इत्यादी प्रवेश परीक्षा तसेच वेगवेगळ्या बोर्ड परीक्षा जसे की स्टेट बोर्ड, सीबीएससी, आयएससी, एनआयओएस, आयबी इत्यादी व त्याचे वेगवेगळे स्वरूप एकाच वेळी पेलावे लागते. परिणामी काही विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेची तयारी करताना, बोर्ड परीक्षेची सखोल तयारी होत नाही.
लेखन कौशल्याचा अभाव
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना संक्षिप्त उत्तरे लिहिण्याची डमी कॉलेज किंवा क्लासमध्ये तयारी कमी पडते. अनेक विद्यार्थी केवळ तोंडी तयारी, ‘एमसीक्यू’ची तयारी, यूट्यूब व्हिडीओज किंवा नोट्सवर अवलंबून राहताना दिसतात. विशेषतः त्यामुळे अनेक विषयांमध्ये बोर्डाला अपेक्षित असणाऱ्या उत्तरासाठी टप्प्याटप्प्याने लेखन सरावाचा अभाव दिसतो.
कोरोनामुळे समस्या
कोरोना काळात अभ्यासाच्या बदललेल्या पद्धतीमुळे, डिजिटल स्क्रीनच्या वाढत्या वापराने लेखन सरावावर परिणाम झाला आहे. बोर्ड परीक्षा मूल्यांकनात ‘उत्तराची स्पष्टता, अचूकता, सुसंगती व मांडणीची शिस्त’ यांना जास्त महत्त्व दिले जाते.
डमी, इंटिग्रेटेड व टायअप महाविद्यालये
डमी, इंटिग्रेटेड व टायअप महाविद्यालयात मुलांमध्ये स्व-प्रेरणा नसल्यास अनेक विद्यार्थ्यांना ‘स्वयंशिस्त’ पाळणे अवघड जाते. अनेक क्लासेस बोर्डाच्या तयारीला प्राधान्य देत नाही व डमी कॉलेजला मुलं जात नाही, मग बोर्डाच्या परीक्षेची तयारी करावी कशी? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो.
पालकांची जबाबदारी
बारावीतील जानेवारी ते जून हा कालावधी प्रवेश परीक्षा देण्यामध्ये जातो. पालकांनी नोव्हेंबरपर्यंत आपल्या मुलाच्या तयारीचे खरे आकलन करूनच कोणत्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या हे ठरवायला हवे. ‘सर्वजण देतात, म्हणून आम्हालाही पण द्यायच्या आहेत’ या प्रवृत्तीमुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो.
दिशा बदलण्याची गरज
कंपार्टमेंट परीक्षा ही केवळ अपयशाचे लक्षण नसून, शिक्षण पद्धतीतील त्रुटी, अभ्यासातील गोंधळ, क्षमता व आवड न बघता निवडलेल्या स्पर्धा परीक्षा व नियोजनाचा अभाव दर्शवते. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी लेखन कौशल्य वाढवणे, परीक्षांचे प्राधान्य ठरवणे, प्रवेशाच्या किमान पात्रतेच्या निकषावर लक्ष देणे व वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शाळा, पालक, क्लासेस व करिअर समुपदेशक यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी समर्पक आणि व्यक्तिगत मार्गदर्शन करून, कंपार्टमेंट परीक्षेची वेळ न येऊ देण्याची हीच ‘खरी वेळ’ आहे.