- डॉ. अंजली जगताप-रामटेके
पारंपरिक अभ्यासक्रमांखेरीज व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरत आहेत. नोकरी मिळविण्याच्या तसेच स्वतःचा उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या शिक्षणाचा लाभ होतो. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त आहे.
‘यूजीसी’च्या नवीनतम ‘अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम’ योजनेअंतर्गत याचा विचार केला गेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाविद्यालयात मिळणारे शिक्षण आणि प्रत्यक्ष नोकरीसाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये यातील अंतर दूर करण्याच्या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
यामध्ये संबंधित कौशल्याशी निगडित क्षेत्रातील औद्योगिक संस्था विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभवाची संधी उपलब्ध करून देतील तसेच प्रशिक्षणादरम्यान त्यांना आर्थिक सहकार्यदेखील केले जाईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्रामार्फत २०१४ पासून बॅचलर ऑफ व्होकेशन (बी. व्होक.) हे पदवी अभ्यासक्रम चालवले जातात. ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ या अभ्यासक्रमामध्ये प्रारंभापासूनच समाविष्ट आहे. पदवी शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये तांत्रिक कामाचे प्रशिक्षण दिले जाते. शक्यतो ज्या उद्योगधंद्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची जास्त मागणी आहे, अशा क्षेत्राशी संबंधित असे हे अभ्यासक्रम आहेत.
उदाहरणार्थ, नवीकरणीय ऊर्जा किंवा रिन्यूएबल एनर्जी हे वेगाने विस्तारणारे क्षेत्र आहे. सौर, पवन ऊर्जा यांपासून वीजनिर्मिती, जैविक इंधनाचा वापर ही नवीकरणीय ऊर्जा रूपांतरणातील काही मुख्य प्रवाह आहेत. आधुनिक काळात ग्रीन बिल्डिंग, नेट झिरो एनर्जी बिल्डिंग या संकल्पना मूळ धरत आहेत.
शिवाय नवीकरणीय ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्यासाठी शासन अनेक योजना राबवत आहे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, कुसुम योजना या शासनाच्या काही योजना सर्वपरिचित आहेत. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय सातत्याने नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर, विकास आणि संशोधनाला गती देत आहे.
हे प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे अर्थातच विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतात, हा सर्वांत महत्त्वाचा फायदा आहे. बी.व्होक. या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचे आरेखन काळाची गरज आणि उपयुक्तता लक्षात घेऊन केलेले आहे.
तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुख्य व्यावसायिक कौशल्ये शिकवण्याबरोबर व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य, योग, संगणक, भारतीय ज्ञान प्रणाली इत्यादी विषयांचादेखील समावेश केलेला आहे. बारावी विज्ञान तसेच बारावीच्या व्यावसायिक शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत.