भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना 31 जुलैपासून ओव्हल मैदानात असणार आहे. आतापर्यंत पार पडलेल्या मालिकेतील चार सामन्यात इंग्लंडने 2, तर भारताने एक सामना जिंकला आहे. तर एक सामना अनिर्णित ठरला आहे. त्यामुळे मालिकेचा निकाल आता पाचव्या सामन्यात लागणार हे स्पष्ट आहे. इंग्लंडने सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तर मालिका त्यांच्या खिशात जाईल. भारताना हा सामना जिंकला तर मालिका 2-2 ने बरोबरीत सुटेल. पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडने कर्णधार बेन स्टोक्ससह तीन जणांना आराम दिला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी ओली पोपच्या खांद्यावर आहे. इंग्लंडच्या प्लेइंग 11 मध्ये चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिलं आहे. ओव्हल कसोटी सामन्यात खेळपट्टी हिरवीगार असण्याीच शक्यता आहे. वेगवान गोलंदाजांना मदत होईल. त्यामुळे भारतीय संघ कोणत्या 11 खेळाडूंना स्थान देईल याबाबत उत्सुकता आहे. या सामन्यात अर्शदीप सिंग पदार्पण करण्याची शक्यता आहे. कर्णधार शुबमन गिलच्या वक्तव्याने ही बाब जवळपास स्पष्ट झाली आहे.
शुबमन गिलने सामन्याच्या एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, आम्ही संध्याकाळी खेळपट्टी पाहून प्लेइंग 11 बाबत अंतिम निर्णय घेऊ. इंग्लंडने संघात एकाही स्पेशालिस्ट स्पिनरचा समावेश केला नाही. जेकब बेथेल आणि जो रूट यांच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असेल. आमच्याकडे फिरकीसाठी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर आहे. दोघांनी या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान, अंशुल कंबोजला पाचव्या कसोटीत डावललं जाण्याची शक्यता आहे. तर जसप्रीत बुमराह खेळणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
अर्शदीप सिंगला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल की नाही नाणेफेकीचा कौल झाल्यावरच कळेल. जर तसं झालं तर कसोटी खेळणारा 319 खेळाडू ठरेल. आतापर्यंत अर्शदीप सिंग फक्त मर्यादीत षटकांचे सामने खेळला आहे. त्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 21 सामने खेळले असून 37 डावात 30.37 च्या सरासरीने 66 विकेट घेतल्या आहेत. एका डावात 40 धावा देत 6 विकेट घेण्याची सर्वोत्तम कामगिरी त्याच्या नावावर आहे.