ती मध्यरात्री येते आणि लहान मुलांना पळवून नेते, पुण्यात दहशत, 140 सीसीटीव्ही कॅमेरे…
Tv9 Marathi July 30, 2025 10:45 PM

पुण्यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीमुळे दहशतीचे वातावरण होते. भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या तुळजापुरातील 5 जणांची टोळी अखेर गजाआड झाली आहे. कात्रज परिसरातून दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिला भीक मागायला लावण्यासाठी नेणाऱ्या एका टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून चिमुरडीची सुखरूप सुटका करत टोळीतील पाच जणांना अटक केली असून, यात एका महिलेचाही समावेश आहे. सुनील सिताराम भोसले (वय 51), शंकर उजण्या पवार (वय 50) शालुबाई प्रकाश काळे (वय 45) गणेश बाबू पवार (वय 35) आणि मंगल हरफुल काळे (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. हे सर्वजण मोतीझारा, ता. तुळजापूर, जी धाराशिव येथील रहिवाशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धनसिंग हनुमंत काळे (वय 25) यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादी धनसिंग काळे हे कात्रज येथील वंडरसिटीजवळ झोपडीवजा घरात राहतात. त्यांना चार मुले आहेत. यातील दोन वर्षाच्या दोन जुळ्या मुली आहेत. 25 जुलैच्या रात्री ते गाढ झोपेत असताना त्यांच्या दोन वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. मध्यरात्री जाग आल्यानंतर आपली छोटी लेक सापडत नसल्याचे धनसिंग यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी झोपेतून मुलीला पळवून नेल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार नोंदवली जाताच पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

असा केला पर्दाफाश

तपासादरम्यान वंडर सिटी परिसरातील सीसीटीव्हीत दुचाकीवर तिघेजण या चिमुरडीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कात्रज ते पुणे रेल्वे स्टेशन दरम्यानचे 1-2 नव्हे तब्बल 140 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या तिघांव्यतिरिक्त आणखी दोघे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींची ओळख पटवून माहिती घेतली असता सर्वजण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी असल्याची माहिती भारती विद्यापीठ तपास पथकाला मिळाली.

अखेर चिमुरडी सुखरूप सापडली

त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व अंमलदार आणि गुन्हे शाखेचे एक पथक अशी दोन पथके तुळजापूर या ठिकाणी गेले. आणि धाराशिव पोलिसांच्या मदतीने सुरुवातीला तीन आरोपी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अपहरण झालेली 2 वर्षांची चिमुरडी सुखरूप सापडली. त्यानंतर अधिक चौकशी करत पोलिसांनी इतर दोन आरोपींना ताब्यात घेतले. भीक मागण्यासाठी आरोपींनी या चिमुरड्या मुलीचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या पाचही जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना दोन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.