राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता वेगवेगळ्या महापालिकांवर आपलीच सत्ता यावी यासाठी राज्यातील पक्ष कामाला लागले आहेत. युती आणि आघाडीच्या माध्यमातून बेरजेचे राजकारण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नेतेमंडळीही आपल्या सोईसाठी पक्षांतर करत आहेत. असे असतानाच आता पुण्यातून मोठी माहिती समोर येत आहे. इथे मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता पुण्यात राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अण्णासाहेब बनसोडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. अण्णासाहेब हे विधानसभेचे उपाध्यक्षही आहेत. त्यांचेच पुत्र सिद्धार्थ बनसेडे यांनी एकनाथ शिंदे यांची पुण्यात भेट घेतली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे.
या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ बनसोडे हे अजित पवार यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वाटेवर आहेत, असे बोलले जात आहेत. त्यामुळे शिंदे आणि सिद्धार्थ बनसोडे यांच्या या भेटीला फार महत्त्व आले असून ते शिंदे गटात प्रवेश करणार का? असे विचारले जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांत युती झालीच तर आपल्या मतांची विभागणी होऊ नये यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जमेल तिथे एकत्र लढण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच इतर महापालिकांच्या निवडणुकीत नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.