Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?
Saam TV July 30, 2025 11:45 PM
  • माधुरी हत्तीणवरील राजू शेट्टींचं २०१८ सालीचं पत्र पुन्हा चर्चेत

  • नांदणी मठातील माहुत आजारी पडल्याने वनविभागाकडे मदतीची विनंती

  • पत्र सोशल मीडियावर व्हायरल; राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात

  • सध्या हत्तीणची व्यवस्थित देखभाल होत असून ती मठातच आहे

शिरोळ तालुक्यातील नांदणी मठात राहणारी माधुरी हत्तीण सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मात्र यावेळी विषय तिच्या आरोग्याचा किंवा देखभालीचा नसून, थेट राजकारणाशी संबंधित आहे. २०१८ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी वनविभागाला लिहिलेलं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये माधुरी हत्तीण काही काळासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्याची विनंती करण्यात आली होती.

राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर या पत्राची जोरदार चर्चा सुरू झाली असून, यावर राजू शेट्टी यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. "हो, हे पत्र माझंच आहे, पण त्यामागची पार्श्वभूमी लोकांनी समजून घ्यावी," असं म्हणत त्यांनी त्या काळातील स्थिती स्पष्ट केली. २०१८ साली नांदणी मठातील हत्तीची देखभाल करणारे नागाप्पा हे अनुभवी माहुत हृदयविकाराच्या झटक्याने आजारी पडले होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी नोकरी सोडली. त्या परिस्थितीत मठ व्यवस्थापनाकडे हत्तीची देखरेख करण्यासाठी प्रशिक्षित माहुत नव्हता.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

त्यामुळे काही दिवस तरी माधुरीला वनविभागाच्या गडचिरोली येथील हत्तीकेंद्रात ठेवण्याची विनंती मठाच्या विश्वस्तांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी वनविभागाशी अधिकृत पत्रव्यवहार केला होता. मात्र वनविभागाने हत्ती स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. यानंतर मठ व्यवस्थापनाने इस्माईल नावाच्या दुसऱ्या प्रशिक्षित माहुताचा शोध घेतला. तेव्हापासून आजपर्यंत माधुरीची योग्य प्रकारे देखभाल आणि सेवा सुरू आहे. राजू शेट्टी यांनी या विषयावर बोलताना स्पष्ट केलं, "आज काही लोक खोडसाळपणाने आणि राजकीय आकसापोटी हे जुने पत्र पुन्हा पुढे आणत आहेत. मात्र त्यामागे कोणतीही राजकीय भावना नव्हती. त्या काळात हत्तीच्या सुरक्षिततेसाठी आणि मठाच्या विनंतीनुसार मदत केली होती."

Elephant: हत्तीची कमाल शक्ती, जाणून घ्या हत्तीमध्ये किती वजन उचलण्याची क्षमता असते?

सध्या हत्तीण माधुरी मठातच आहे, आणि तिची देखभाल नीट केली जात आहे. मात्र तिच्या नावावरून राजकीय चर्चांना ऊत आला असून, आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला वेगळं वळण मिळू शकतं, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

राजू शेट्टींचं माधुरी हत्तीण संदर्भातील पत्र काय आहे?

२०१८ साली नांदणी मठातील माहुत आजारी पडल्यामुळे, काही दिवस हत्तीला वनविभागाकडे पाठवण्याची विनंती करणारे पत्र राजू शेट्टी यांनी दिले होते.

हे पत्र आता का चर्चेत आलं आहे?

सदर पत्र अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यावरून राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

राजू शेट्टी यांचं यावर काय म्हणणं आहे?

हे पत्र खरं असलं तरी त्या मागील परिस्थिती समजून घेणे गरजेचं आहे, असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

सध्या माधुरी हत्तीण कुठे आहे?

माधुरी सध्या नांदणी मठातच आहे आणि इस्माईल या प्रशिक्षित माहुताकडून तिची योग्य देखभाल केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.