गिफ्ट निफ्टी कोसळला, 31 जुलै रोजी शेअर बाजारात मोठी घसरण? ट्रम्प टॅरिफनंतर काय घडणार?
Marathi July 31, 2025 12:25 AM

ट्रम्प दर: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रशियाकडून शस्त्र खरेदी आणि तेल खरेदी करत असल्यानं भारतावर अतिरिक्त दंड लावण्याची घोषणा देखील ट्रम्प यांनी केली आहे. यामुळं गिफ्टी निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सायंकाळी 6:15 वाजता हा निर्देशांक 0.70 टक्क्यांनी घसरुन 24,700 च्या खाली गेला. थोड्या वेळानंतर त्यामध्ये पुन्हा बदल झाला. 7.50 वाजता 0.56 टक्के घसरणीसह गिफ्ट निफ्टी  24,720 अंकांवर होता त्यामुळं भारतीय शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळू शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ 1 ऑगस्टपासून लागू होतील, असं म्हटलं आहे. यामुळं 31 जुलै रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीवर विपरित परिणाम दिसू शकतं, असा अंदाज विश्लेषकांनी वर्तवला आहे. निर्यातदार कंपन्यांवर याचा परिणाम होईल.  आज रुपया चार महिन्यांच्या निचांकी पातळीवर बंद झाला आहे. गुंतवणूकदारांना असं वाटतं की अमेरिकेच्या टॅरिफमुळं भारताच्या निर्यातीवर दबाव वाढेल, त्याचा परिणाम रुपयावर देखील होईल.

सेन्सेक्स 144 अंकांनी म्हणजेच 0.18 टक्क्यांनी वाढून 81,482 वर बंद झाला आहे. निफ्टी 50 मध्ये 34 अंकांची म्हणजेच 0.14 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. निफ्टी 50 निर्देशांक 24,855 अंकांवर बंद झाला.  भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार होण्यास वेळ लागत असल्यानं गुंतवणूकदार पहिल्यापासून सतर्क झाले होते.

अमेरिकेच्या टॅरिफचा रत्न व दागिने उद्योगावर काय परिणाम होणार? कोलिन शाह म्हणतात…

कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कोलिन शाह यांनी अमेरिकेच्या टॅरिफमुळं भारतीय रत्न आणि दागिने उद्योगावर काय परिणाम होईल ते सांगितलं आहे ते म्हणतात, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून शस्त्रास्त्रे आणि ऊर्जा खरेदी केल्याबद्दल दंडात्मक स्वरूपात २५% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. ही भारतासाठी मोठी आर्थिक धक्का देणारी बाब आहे. अमेरिका हा भारताच्या दागिने व रत्नांच्या निर्यातीसाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे. त्यामुळे या निर्णयाचा मोठा फटका निर्यात-आधारित रत्न व दागिने उद्योगाला बसणार आहे, जो देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देतो.

गेल्या दोन वर्षांपासून भारताचा रत्न व दागिने उद्योग रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य-पूर्वेतील संघर्ष यामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा सामना करत आहे. आता ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यामुळे त्यांच्या अस्थिर आणि स्पष्ट नसलेल्या धोरणांमुळे भारतीय बाजारावर पुन्हा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

यापुढे अमेरिकेसोबत व्यापार व्यवहार मंदावलेले राहतील अशी अपेक्षा आहे. मात्र ऑगस्ट अखेरीस होणाऱ्या भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या सहाव्या फेरीत अमेरिकन प्रतिनिधी भारतात येणार असून त्यानंतर परिस्थिती कशी घडते हे पाहणे आवश्यक ठरेल.”

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.