Sakal Anniversary Event : 'सकाळ' वर्धापन दिन यंदा 'सायबर'च्या आनंद भवनामध्ये
esakal July 31, 2025 01:45 AM

Sakal Celebration News : गेली पंचेचाळीस वर्षे कोल्हापूरचा खमका आवाज बनलेल्या ‘सकाळ’च्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा शुक्रवारी (ता. १ ऑगस्ट) होणार आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. ‘सीमापारचा दहशतवाद आणि भारतासमोरील आव्हाने’ या विषयावर ते संवाद साधतील. सायबर कॉलेजच्या आनंद भवनात सायंकाळी साडेपाच वाजता सोहळा होईल.

दरम्यान, ‘सकाळ’ची येथील पंचेचाळीस वर्षांची दमदार वाटचाल, बदलत्या तंत्रज्ञानावर स्वार होत अंकात झालेले बदल, विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकसहभागातून यशस्वी झालेल्या लोकचळवळी...हा सारा प्रवास उलगडणारे स्वतंत्र दालनही येथे सज्ज असणार आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे यांनी गेल्या चार दशकांतील अनुभव आणि दूरदृष्टीने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला नवी दिशा दिली आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या लष्करी कारवाईमध्ये संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार म्हणून श्री. खंदारे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांनी ‘१४ गढवाल रायफल्स बटालियन’मध्ये सेवा देताना चीन-भारत सीमेवरील डोकलाम आणि चुशूलसारख्या संवेदनशील ठिकाणी काम केले.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

कारगिल संघर्ष काळात १९९९ ते २००१ दरम्यान त्यांनी आपल्या बटालियनची सूत्रे सांभाळत पाकिस्तानी सैन्याला आणि दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘१४ गढवाल रायफल्स’च्या जवानांनी ३० मे १९९९ ला पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावणीचा खात्मा केला. फेब्रुवारी २००० मध्ये भारतीय जवानाच्या मृत्यूचा प्रतिशोध घेताना ऑक्टोबर २००० मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाकिस्तानी चौकी ‘रिंग कॉन्टूर’ उद्ध्वस्त करून २६ पाकिस्तानी सैनिक ठार केले.

सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये सैन्य सल्लागार म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत त्यांनी काम सुरू केले. पुलवामा हल्ला, बालाकोट एअरस्ट्राईक, कलम ३७० रद्द करणे आणि ‘सीडीएस’ व ‘डीएमए’ची निर्मितीसारख्या महत्त्वाच्या घटनांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. नवी दिल्लीतील ‘यूएसआय’चे प्रतिष्ठित फेलो आणि गांधीनगर येथील राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचे एमेरिटस् रिसर्च फॅकल्टी म्हणून ते कार्यरत आहेत. साहजिकच त्यांचा संवाद सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणार आहे.

पाच कर्तृत्ववंतांचा गौरव होणार

वर्धापन दिनानिमित्त ‘संपन्नतेच्या दिशेने...’ या विषयावरील विशेषांकही प्रसिद्ध होणार आहे. परंपरेप्रमाणे वर्धापन दिन मुख्य सोहळ्यात विविध क्षेत्रांतील पाच कर्तृत्ववंतांचाही गौरव होणार आहे. देशातील पहिले सौरऊर्जेवरचे गाव शेळकेवाडी (ता. करवीर) या गावासह बाराशेहून अधिक स्टार्टअपच्या मार्गदर्शक गंधाली दिंडे, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर रोहिणी देवबा, शेतीमधील दहा पेटंट मिळवणारा शिवम मद्रेवार, कृतीतून पर्यावरण जपणारे डॉ. युवराज मोटे यंदाच्या सोहळ्याचे गौरवमूर्ती आहेत.

चला, आनंद भवन येथे एकवटूया...

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या फेर उभारणीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे यंदाचा सोहळा सायबर कॉलेजच्या आनंद भवन येथे सायंकाळी साडेपाचला होईल. मुख्य सोहळ्यानंतर परंपरेप्रमाणे स्नेहमेळावा होईल. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ परिवारा’ने केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.