लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधन आधीच मोठी बातमी, जुलै, ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार ? टेन्शन की गुड न्यूज?
Tv9 Marathi July 31, 2025 08:45 PM

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. गेल्या वर्षी महायुती सरकारने जुलै महिन्यात लाकी बहीण योजनेची घोषणा केली, त्याअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. वर्षभरापासून सुरू असलेल्या या योजनेचा 2 कोटींपेक्षा अथधिक महिलांनी लाभ घेतला आहे. मात्र असं असलं तरी जुलै महिन्याचे पैसे काही या लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाहीत. जुलै संपून आता उद्या ऑगस्ट उजाडेल, तरी 1500 रुपयांची बहिणी वाटत पहात आहेत.

राखीची मिळणार भेट ?

मात्र याच जुलैच्या हप्त्याबबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला एक भेट मिळणार आहे. जुलै-ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्रच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ते पैसे नेमक कधी येणार याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे जमा होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून तसे झाल्यास महिलांना 3000 रुपये एकत्र मिळाल्याने त्यांचा राखीचा सण मात्र चांगलाच आनंदात जाईल असं दिसतंय.

या योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणींचे एक प्रकारे मासिक वेतनच असून, ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले होते. त्यामुळे या महिन्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पैसै मिळाल्यास, राखी पौर्णिमेनिमित्त सरकारची ही लाडक्या बहिणींना आगळी वेगळी भेट असू शकते. अधिकृत तारीख मात्र अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सर्व लाभार्थी महिला या पैशांची वाट बघत असून त्यांचा राखीचा सण गोड होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लाडक्या भावांचाही पैशांवर डल्ला

दरम्यान दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेत अनेक घोटाळे झाल्याचे आत्तापर्यंत उघड झाले असून 14 हजारांपेक्षा जास्तच पुरूषांनी या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये लाटल्याचे काही दिवसांपूर्व उघड झाले होते. त्यामुळे मोठी खळबळ माजली. एवढंच नव्हे तर 10 महिन्यांपर्यंत लाडक्या पुरूषांनी 1500 रुपये लाटले असून वाटप करण्यात आलेल्या या रकमेचा आकडा 21 कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची छाननी झाल्यावर त्यातूनच ही माहिती समोर आली होती.

सरकारी कर्मचारी महिलांचाही पैशावर डल्ला

तर यापूर्वी अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले होते. राज्यातील तब्बल 1 लाख 60 हजांरापेक्षा अधिक (महिला-पुरूष) कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असता हे धक्कादायक सत्य उघड झालं.  तब्बल 2 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले होते.  लाडकी बहीण ही योजना मूलत: दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी असतानाही, अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी देखील पैशांवर डल्ला मारला. सरकारी कार्यालयांमध्ये काम करून, 6व्या व 7 व्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन, तसेच गलेलठ्ठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव न सुटल्याने त्यांनी गैरफायदा घेत लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटले होते, अशी माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती.

दरम्यान लाडक्या बहिणींच्या पैशांचा लाभ लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असून राज्य सरकारकडून कारवाईचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाटलेली लाभाची रक्कम ही कर्मचाऱ्यांकडून वसूल केली जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.