Satara News: 'साताऱ्याच्या साहिल जाधवचा जर्मनीत झेंडा'; तिरंदाजीत सुवर्णपदकाला घातली गवसणी, जागतिक विद्यापीठ स्पर्धेत दाखवली चमक
esakal July 31, 2025 08:45 PM

नागठाणे : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राची पताका उंचावताना साहिल जाधव याने जर्मनीमध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत तिरंदाजी खेळात देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीतील त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे.

Success Story: 'संकटावर मात करत डॉ. आदित्य चिंचकर यांची युपीएससीत धडाकेबाज घोडदौड'; मिळवली ४० वी रँक

साहिलेने जर्मनीतील राईन-रुहर येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाउंड आर्चरी विभागात ब्रिटनच्या स्कॉटला पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. साहिल हा सातारा तालुक्यातील करंडी गावचा. त्याचे वडील राजेश जाधव हे साताऱ्यात खासगी नोकरीला आहेत. आई सीमा या माध्यमिक शिक्षिका. साहिलचे प्राथमिक शिक्षण हे साताऱ्यातील अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक शाळेत अन् माध्यमिक शिक्षण अनंत इंग्लिश स्कूलमध्ये झाले. सध्या तो साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेतो.

दहावीनंतर साहिल तिरंदाजी खेळाकडे वळला. त्या वेळी वाई येथे आयोजित शिबिरात त्याने आपल्या नैपुण्याची चमक दाखविली. तिथे प्रशिक्षक चंद्रकांत भिसे यांनी त्याच्यातील गुणवत्ता हेरली. पुढे ‘दृष्टी ॲकॅडमी’चे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांनी या गुणवत्तेला पैलू पाडले. गेल्या सात वर्षांच्या काळात साहिलने जिल्हा, राज्य पातळीवर भरीव यश पटकाविले आहे. सध्या तो कोलकत्यात ‘साई’ संस्थेत सराव करत आहे.

Success Story: शंकरबाबांची दृष्टिहीन कन्या माला झाली सरकारी अधिकारी; दत्तक कन्येला वडिलांचे नावच नाही, ममत्वही मिळालं

साहिल हा प्रचंड मेहनती खेळाडू आहे. कित्येकदा त्याला यशाने हुलकावणी दिली. मात्र, तो कधीच नाउमेद झाला नाही. हीच गोष्ट आज त्याला जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकाकडे घेऊन गेली.

- प्रवीण सावंत, प्रशिक्षक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.