पनवेलमध्ये पादचाऱ्यावर धारदार वस्तऱ्याने हल्ला
पनवेल, ता. ३० (वार्ताहर) ः पनवेल शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एका पादचाऱ्यावर अज्ञात लुटारूने धारदार वस्ताऱ्याने हल्ला करत त्याच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने लुटून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २८ जुलैच्या मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास पनवेल रेल्वे स्थानकाजवळ घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात लुटारूविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
जखमी पादचारी मुकेश छेडा (वय ५१) हे आपल्या कुटुंबासह पनवेल येथे राहतात. छेडा हे सांताक्रुझ (मुंबई) येथील एका इलेक्ट्रिक दुकानात काम करतात. दररोजप्रमाणे काम संपवून रविवारी रात्री ते लोकलने पनवेल रेल्वे स्थानकात पोहोचले होते. मात्र रिक्षा उपलब्ध न झाल्यामुळे ते रेल्वे स्थानकातून एसटी डेपोच्या दिशेने पायी जात होते. त्याचवेळी एक अज्ञात तरुण त्यांच्याजवळ येऊन गांजाची विचारणा करू लागला आणि अनपेक्षितपणे त्यांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. छेडा यांनी प्रतिकार केल्यावर लुटारूने खिशातून धारदार वस्तरा काढून त्यांच्या डाव्या मनगटावर, डोळ्याजवळ व नाकावर गंभीर हल्ला केला. या हल्ल्यात छेडा रक्तबंबाळ झाले. लुटमार केल्यानंतर आरोपी जवळच्या झोपडपट्टीत पळून गेला. जखमी अवस्थेत छेडा यांनी धाडसाने पनवेल शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदवली. पनवेल पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे. या घटनेमुळे पनवेलमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी सुरक्षेची मागणी होत आहे. पोलिसांनी नागरिकांना रात्री उशिरा प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, छेडा यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.