'ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन'
esakal July 31, 2025 12:45 PM

सायली शिंदे

सतत पोट फुगलेले वाटणे, जेवल्यावर लगेच आंबट ढेकरा, किंवा बद्धकोष्ठता ही फक्त पचनसंस्थेची त्रासदायक लक्षणे नाहीत; ही आपल्या जीवनशैलीमध्ये बदलांची गरज असल्याचे सांगणारी धोक्याची घंटा असते. आजकालची धावपळीची दिनचर्या, झटपट आहार, कमी हालचाल, आणि सततचा ताण हे पचनाच्या त्रासांचे प्रमुख कारण आहे. योगशास्त्रात यावर प्रभावी उपाय आहेत. विशिष्ट आसनांमुळे शरीरातील अपान वायू निघून जातो, पचन क्रिया सुधारते, लिव्हर, पॅन्क्रियाजसारखे अवयव सक्रिय होतात.

  • पवनमुक्तासन : वायू दूर करणे, अपचन, पोट फुगणं यावरती उपयुक्त.

  • भुजंगासन : अन्ननलिकेतील आम्ल उलट प्रवाह कमी होतो. पोटावर ताण आल्यामुळे पचन सुधारते.

  • अर्धमत्स्येन्द्रासन (कटिवक्रासन) : पोटातील अवयवांवर योग्य दाब देतो, मलावष्टंभ कमी करतो. आतड्यांची मृदू हालचाल होते.

  • वज्रासन : जेवल्यावर लगेच बसल्यास अन्नपचनास मदत होते. जेवणानंतर करता येणारे एकमेव आसन.

  • धनुरासन : पचनसंस्थेचा रक्तप्रवाह वाढतो, ॲसिडिटीवर परिणाम होतो.

प्राणायाम : मन आणि शरीरासाठी

प्रत्येक आजारामागे मानसिक कारणेही असतात. पचनसंस्थेवर ताणतणावांचा थेट परिणाम होतो. त्यामुळे नियमित प्राणायाम करणे महत्त्वाचे आहे.

  • अनुलोम-विलोम : मानसिक शांतता आणि हार्मोनल समतोल. रोज पाच-दहा मिनिटे.

  • कपालभाती : पोटातील अवयवांना मॉलिश मिळते, अपचन व गॅसेसवर उपयोगी. हळूहळू सुरुवात करून वाढवा.

  • भ्रामरी : तणाव कमी करून पचनक्रिया सुधारते.

  • शीतली / शीतकारी प्राणायाम : आंतरिक उष्णता कमी होते, ॲसिडिटीवर फायदेशीर.

आहारातील बदल

सकाळी उठल्यावर कोमट पाणी + लिंबू + मध. गोड, उष्ण, तूपयुक्त व स्निग्ध आहार योग्य प्रमाणात घ्या. कडधान्ये, मैदा, पनीर, तळलेले पदार्थ कमी करा. दर तीन-चार तासांनी थोडे थोडे खाणे पचनास योग्य. रात्रीचे जेवण लवकर आणि हलके असावे. पुदिना, अजवाइन, सुंठ यांचा उपयोग करा.

दैनंदिन दिनचर्या कशी असावी?

  • सकाळी लवकर उठून तीस-पंचेचाळीस मिनिटांचा योगाभ्यास.

  • जेवल्यावर थोडावेळ वज्रासन.

  • झोपण्यापूर्वी फोन बाजूला ठेवा व भ्रामरी प्राणायाम करा.

  • रोज विशिष्ट वेळी शौचास जाण्याची सवय लावा.

  • तणाव कमी करणारी क्रियाशील जीवनशैली अंगीकारा.

ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठता ही केवळ शारीरिक समस्या नाही, ती मन आणि शरीर यांच्या समतोलाचा भंग आहे. योग आणि प्राणायाम पचन सुधारण्यासाठी नव्हे, तर जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठीही शिकवतात. ‘सर्व रोगांचे मूळ हे अपचनामध्ये आहे’ असे आयुर्वेद सांगतो. योगाने हे मूळ बळकट करता येते, हे लक्षात ठेवा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.