स्वत:शी मैत्री
esakal July 31, 2025 12:45 PM

अश्विनी आपटे- खुर्जेकर

येत्या रविवारी आपण फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री दिवस साजरा करणार आहोत. मैत्री म्हणजे आयुष्याला मिळालेली एक सुंदर भेट. जसं आपल्याला हवा, पाणी, अन्न आवश्यक आहे, तशीच खरी मैत्रीही आपल्या भावनिक आरोग्यासाठी आवश्यक असते. फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं अनेक जणांना आपले जुने मित्र-मैत्रिणी आठवतात. सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. आठवणी शेअर केल्या जातात. पण या सगळ्यात एक प्रश्न मात्र मनात निर्माण होतो, खरंच मी स्वतःची मैत्रीण आहे का? आणि मैत्रिणींनो हा प्रश्न तुम्हीही स्वतःला विचारणं अतिशय महत्त्वाचं आहे.

आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल, की आपल्या आजूबाजूला मित्र-मैत्रिणी असतील, तर कठीण प्रसंगातही आपण सावरतो. एखादी गोष्ट मनात असताना ती न बोलताच समजणारी मैत्रीण, तुमच्या यशावर मनापासून आनंद होणारा तुमचा मित्र, तुमच्या चुका स्पष्टपणे सांगणारे आणि तुम्हाला योग्य वेळेला साथ देणारे मित्र मैत्रीण, तुमचं आयुष्य समृद्ध करतात. कामाच्या ठिकाणी, घरात, आजूबाजूला अशी माणसं असतील, तर अगदी कठीण परिस्थितीतही तुमचं मन शांत राहतं आणि अशा माणसांची साथ मिळणं म्हणजे नशिबाचीच गोष्ट.

मैत्रिणींनो, पण तुमच्या आमच्या बाबतीत मात्र गोष्ट थोडी वेगळी असते. घराच्या जबाबदाऱ्या कुटुंब, नोकरी, व्यवसाय या सगळ्यांमध्ये आपल्याला स्वतःला वेळ देणं शक्य होत नाही. मग मित्र-मैत्रिणींची गोष्ट लांबच राहिली आणि मित्र-मैत्रिणी असले, तरी त्यांच्याशी मन मोकळं करण्यासाठी जो वेळ, जागा आणि मानसिक निवांतपणा लागतो, तो सगळ्यांना मिळतोच असा नाही. मग अशा वेळेला कोणाची साथ आपल्याला खरोखरच सावरणारी ठरते? तर ती म्हणजे स्वतःची.

आता स्वतःशी मैत्री करणं म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या मैत्रिणीसारखं स्वतःला समजून घेणं, स्वतःला वेळ देणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि तसंच स्वतःचे गुण ओळखणं. आपण अनेकदा स्वतःवर टीका करतो. माझं हे चुकलं, माझ्यामुळे काम बिघडलं, मला हे जमतच नाही, मी खूप मागे आहे; पण आपल्या मेहनतीची, सहनशक्तीची, मनापासून केलेल्या गोष्टींची आपण कधी स्वतःला दाद देतो का? ही दाद, हे कौतुक दुसऱ्यांकडून मिळत नसेल, तर आपणच का नाही आपली स्वतःची पाठ थोपटू शकत?

आपण आपल्या मैत्रिणीला तिच्या चुकांबद्दल समजूतदारपणे मार्गदर्शन करतो. तिच्या यशावर आनंद साजरा करतो. तिला वेळोवेळी समजावतो. मग स्वतःसाठी सुद्धा आपण या गोष्टी का नाही करू शकत? स्वतःशी मैत्री करायची असेल, तर स्वतःला समजून घ्यावं लागेल. आपल्या भावना, गरजा, इच्छा यांना जागा द्यावी लागेल. आपल्याला काय हवंय, काय नकोय हे स्पष्टपणे जाणून घ्यावं लागेल आणि हीच खरी सुरुवात असेल, तुमची स्वतःशी मैत्री करण्याची.

मैत्रिणींनो, तुम्ही स्वतःशी मैत्री केली, की दुसऱ्यांशी नातं जोडणं अधिक सुलभ होईल. कारण एकदा आपण स्वतःला स्वीकारलं, की दुसऱ्याचा स्वीकारही सहज होतो. आपण जबाबदारीनं जगतो, नोकरी करतो, व्यवसाय सांभाळतो, घर सांभाळतो, समाजाचं भान ठेवतो; पण हे सगळं करत असताना, आपण आपला आवाज गमवला, आपलं अस्तित्वच हरवून बसलो, तर ते परत मिळवणं ही काळाची गरज आहे.

फ्रेंडशिप डे ही केवळ दुसऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नाही तर स्वतःलाही एक आनंदी, समजूतदार आणि प्रेमळ मित्र म्हणून स्वीकारण्याची एक चांगली संधी आहे. आज आरशात बघून नक्की म्हणा, ‘मी तुझ्याबरोबर आहे, चुकलीस तरी, जिंकलीस तरी, तुला मी सोडणार नाही.’ त्यामुळे मैत्रिणींनो, स्वतःशी मैत्री जितकी मजबूत कराल तितकं तुमचं आत्मबळ आणि आत्मविश्वास अधिक उजळून दिसेल. आगामी मैत्रीदिनानिमित्त माझ्याकडून माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.