ढिंग टांग : कठोर कारवाई..!
esakal July 31, 2025 06:45 PM
ब्रिटिश नंदी

माझ्या सहकाऱ्यांनो, सर्व अधिकाऱ्यांना मी या दालनातून आत्ताच निघून जाण्यास सांगितले. कारण आता यापुढे मी जे काही बोलणार आहे, ते नोकरशाहीला कळणे योग्य नाही. नोकरशाहीतले काही अधिकारी ताबडतोब मीडियावाल्यांना फोन लावून बातम्या देतात, असा मला वहीम आहे. तुम्हाला चार गोष्टी सांगायच्या आहेत. त्यातल्या दोन कानात सांगायच्या आहेत, आणि दोन कानाखाली सांगायच्या आहेत.

आधी कानात सांगायच्या दोन गोष्टी सांगतो…

एक म्हणजे, आपल्या गतिमान आणि विकासाभिमुख सरकारची यथेच्छ बदनामी होत आहे. आणि या बदनामीला तुम्हीच कारणीभूत आहात! सकाळचा भांडुपचा भोंगा बंद पडावा म्हणून मी स्वत: खूप प्रयत्न केले. भोंग्याचा आवाज कमी व्हावा, म्हणून मी दुसरा भोंगाही नियुक्त केला होता. पण ध्वनिप्रदूषणाव्यतिरिक्त काहीही घडले नाही. आपल्यापैकीच काही जण त्या भोंग्याचा व्हाल्युम वाढवून येतात, असा संशय मला येतो. दुसरी, म्हणजे आपण सगळे नामदार आहोत. जबाबदार व्यक्ती आहोत. सार्वजनिक आयुष्यात माणसाने बरे वागावे. चांगला पोशाख करावा. स्वच्छ कपड्यांचे प्रदर्शन करावे. पण दुर्दैवाने आपलेच काही मंत्री गंजिफ्रॉकवर हिंडताना दिसले. मंत्री महोदयांनी हातात डाळराइसची पिशवी घेऊन गंजिफ्राकावर हिंडणे बरे दिसते का? तुम्हीच सांगा!! डाळराइस खराब होता म्हणून गंजिफ्रॉक…कोंबडीवडे असते तर काय झाले असते? मला कल्पनाही करवत नाही…

दुसरा एक मंत्री पलंगावर बसून शिगरेट ओढत शेजारी पैशांनी भरलेली उघडी ब्याग ठेवून फोनवर गप्पा मारताना टीव्हीवर दिसला. उघड्या ब्यागेचे एवढे काही नाही, पण शिगरेट ओढणे आरोग्यास अपायकारक आहे, हे तर पाकिटावर पण लिहिलेले असते. शिगरेटी ओढताना मंत्र्याने काळजी घेतली पाहिजे. धूम्रपान वाईट असते!

तिसऱ्या एका मंत्र्याने तर कहरच केला. भर सभागृहात बावीस मिनिटे मोबाइलवर रमीचा डाव मांडला. ते बघून मीच पॅक झालो!! काही लोकांनी त्याचाच व्हिडिओ काढून माध्यमांना दिला. एवढ्यावर थांबले नाही, सदरील मंत्री आपल्याच सरकारला भिकारी म्हणाला! माझ्या काळजाला घरे पडली. निदान आपला नेता याच सरकारात अर्थमंत्री आहे, याचे तरी भान ठेवायला नको का? रमीच्या आरोपानंतर घडलेल्या घटनांचा सीक्वेन्स तरी नीट लावा, मग तुम्हाला कळेल!! रात्र वैऱ्याची आहे…

सहकाऱ्यांनो, आता कानाखाली सांगण्याच्या दोन गोष्टी!

एक, हे महायुतीचे सरकार आहे. तीन पक्षांचे आपले सरकार अतिशय गतिमान पद्धतीने राज्याचा विकास घडवत आहे. मी मुख्य कारभारी असलो तरी इतर दोन पक्षांचे दोन नेते उपकारभारी आहेत. त्यांच्याच पक्षातील सहकारी असे विचित्र वागत आहेत. त्यांना मी काढून कसे टाकणार? अशा बेशिस्त मंत्र्यांना शिक्षा ठोठावण्याचा अधिकार मी राखून ठेवला आहे. आपल्याच काही सहकाऱ्यांच्या बेताल बडबडीमुळे आणि बेलगाम वागण्यामुळे सरकारची कुचंबणा होत आहे. हे खपवून घेणार नाही. सहन केले जाणार नाही.

दोन, कारवाई येणेप्रमाणे होईल

गंजिफ्रॉकवर क्यांटीनमध्ये राडा करणाऱ्या मंत्रीसहकाऱ्यास मी तीन दिवस डाळराइस खाण्याची मनाई करत आहे. हीच कठोर शिक्षा त्यांना योग्य ठरेल. पैशांची उघडी ब्याग खोलीत ठेवून शिगरेट ओढत मोबाइलवर बोलणाऱ्या मंत्रीमहोदयांना च्युइंगम चघळून शिगरेटची तलफ घालवण्यास फर्मावण्यात येत आहे. सभागृहात रमी खेळणाऱ्या मंत्रीमहोदयांना पत्त्यांचा क्याट तातडीची बाब म्हणून मंजूर करण्यात येत असून अन्य मंत्र्यांनीही इच्छा प्रदर्शित केल्यास आयपॅड आणि आयफोनसह पत्त्यांचा क्याटही सरकारी खर्चाने देण्याची शिफारस करणेत येईल.

ही कठोर शिक्षा तातडीने अंमलात आणली जाईल, याची नोंद घ्यावी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.