Chhagan Bhujbal : विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याकडून आता कृषीखातं काढून घेण्यात आलं आहे. हेच कृषीमंत्रिपद आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलंय. तर कोकाटे यांना क्रीड मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्रिपद फारच चर्चेत आहे. असे असतानाच आता या पदाविषयी अन्न व नागरी पुरवाठमंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
छगन भुजबळ नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना यांनी कोकाटे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केले. तसेच त्यांनी या मंत्रिपदाविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर मला दिली होती. मात्र कृषीमंत्री या पदाला ग्रामीण भागातील व्यक्ती या पदाला जास्त न्याय देऊ शकते, अशी माझी त्यावेळी भूमिका होती, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. तसेच कुठलेही खाते लहान मोठे नसते. आपण काय काम करतो यावर सगळे अवलंबून असते, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेत असतात. यावर मी अधिक बोलणं योग्य राहणार नाही. – याआधी देखील अनेक नेते कृषिमंत्री राहिलेले आहेत. शरद पवार यांनीदेखील देशाचे कृषीमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. राजीनामा मागणे हे विरोधकांचे कामच आहे, अशा भावना यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्या निकालावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. अभ्यास करून न्यायव्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. तसेच तुरुंगात गेलेली वर्षे कोण भरून देणार? असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.
दरम्यान, कृषीमंत्रिपद मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मनले आहेत. तर दुसरीकडे कोकाटे यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या ते पुण्यात आहेत.