युवकांनी नशेपासून दूर रहावे
राजेंद्र यादव ः ‘गोगटे’ महाविद्यालयात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : युवकांनी नशेपासून दूर रहावे, असे आवाहन ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी आणि पोलिसांनी मिळून नशेचे दुष्परिणाम व त्याचे सामाजिक परिणाम यावर प्रकाश टाकणारा प्रबोधनपर व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून युवकांना विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये एनएसएस स्वयंसेवकांनी जनजागृतीपर घोषवाक्ये, दृढ निश्चयाचे संदेश आणि दृश्य माध्यमांचा वापर करून प्रभावी सादरीकरण केले. ग्रामीण पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजात वाढणाऱ्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर प्रकाश टाकत कायद्याचे आणि आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमात एनएसएस विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस रसाळ, अमन वारिशे, आर्यन जमादार आणि पोलिस उपनिरीक्षक उदय धुमास्कर, हवालदार सुनील सावंत, हवालदार रूपेश भिसे, हवालदार जाधव, महिला पोलिस हवालदार तेलवणकर, महिला पोलिस हवालदार प्रिया सुर्वे व सुगंधा दळवी सहभागी होते. एनएसएस विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.