‘गोगटे’च्या विद्यार्थ्यांकडून
कांदळवन परिसंस्थेचा अभ्यास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागामार्फत जागतिक कांदळवन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कांदळवन परिसंस्था व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी रनपार येथील कांदळवन परिसंस्थेला विद्यार्थ्यांनी भेट दिली. परिसंस्थेतील कांदळवन व सहयोगी कांदळवनाच्या प्रजाती, तेथील फुलोरा यांची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवली.
कांदळवनांचे महत्त्व प्रा. शरद आपटे व वनस्पतिशास्त्र विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांनी डॉ. केळकर सभागृहात व्याख्यान दिले. प्रा. आपटे यांनी रत्नागिरीतील कांदळवनांची विविधता यावर मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने चिपी, मारंडी, कांदळ अशा प्रमुख कांदळ वनस्पती तसेच सागरगोटा, कडू मेहंदी, करंज अशा सहयोगी वनस्पतींची ओळख डॉ. पटवर्धन यांनी करून दिली. मी खारफुटी ही डॉ. पटवर्धन यांची कविता पर्यावरणातील खारफुटीची भूमिका व खारफुटीचे संवर्धन अधोरेखित करून गेली. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी केले. व्याख्यात्यांची ओळख डॉ. विराज चाबके यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. परेश गुरव यांनी केले. प्रा. प्रियंका शिंदे-अवेरे यांनी आभार मानले.