Prajwal Revanna: माजी पंतप्रधानांचा नातू, माजी खासदार बलात्कार प्रकरणी दोषी; प्रज्वल रेवन्ना याला कोर्टातच रडू कोसळलं!
Sarkarnama August 02, 2025 06:45 AM

Bengaluru News: जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याविरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणात त्याला कोर्टानं दोषी ठरवलं आहे. 14 महिन्यानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. बलात्कारप्रकरणी दोषी ठरविल्यानंतर प्रज्वल रेवण्णा याला कोर्टातच रडू कोसळलं. प्रज्वल रेवन्ना हा माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा यांचा नातू आहे.

माजी खासदार आणि जेडीएसमधून हकालपट्टी झालेला प्रज्वल रेवन्ना याला आज बंगलूरु येथील एका विशेष न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं आहे. उद्या (शनिवारी) त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी हा निकाल दिला.

28 एप्रिल ते 10 जून 2024 दरम्यान कर्नाटकमधील होलेनारसीपुरा पोलिस ठाण्यामध्ये त्याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत. चार अत्याचार प्रकरणांपैकी एका प्रकरणावर आज सुनावणी झाली. हसन जिल्ह्यातील होलेनरसीपुरा येथे एका ४८ वर्षीय महिलेवर 2021 मध्ये प्रज्वल रेवन्ना याने दोन वेळा बलात्कार केला होता. त्यांचे व्हिडिओ त्याने आपल्या मोबाईलवर चित्रित केले होते.

त्याच्यावरील प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रज्वल रेवन्ना हा हसन लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाला होता. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर जेडीएसने पक्षातून त्याची हकालपट्टी केली होती.

किती शिक्षा होऊ शकते? विशेष तपास पथकाने (एसआयटी) महिलेवरील अत्याचार प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले होते. न्यायालयाने (Court) प्रज्वलला दोषी ठरवले आहे, त्याला कमीत कमी 10 वर्षे आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. हे प्रकरण कधी उघडकीस आले?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिल 2024 रोजी हसन मध्ये प्रज्वल रेवन्ना यांच्याशी संबंधित कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते. गेल्या वर्षी ३१ मे रोजी जर्मनीहून बेंगळुरू विमानतळावर आल्यानंतर होलेनरसीपुरा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एसआयटीने प्रज्वल रेवन्ना याला अटक केली होती.

अनेक महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली एसआयटीने त्याला अटक केली होती. प्रज्वल बंगळूरच्या परप्पन अग्रहार तुरुंगात आहे. प्रज्वलचे वडील माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना त्याच प्रकरणात अटक केली होती. काही दिवसानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. तक्रारीत आरोपी म्हणून नाव असलेल्या रेवण्णाची आई भवानी रेवण्णा यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

या प्रकरणी सीआयडीने 26 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. 2000 पानांचे दोषारोपपत्र लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले होते. प्रज्वलविरुद्ध आणखी तीन अत्याचारांचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यावर कधी सुनावणी होते, याकडे लक्ष लागले आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.