कोकाटेंकडून कृषीखातं काढलं, आता फडणवीसांची सर्वांनाच वॉर्निंग, चूक होताच…
GH News August 01, 2025 03:13 PM

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळताना दिसल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडचे कृषीखाते काढून घेण्यात आले आहे. त्यांच्यावर आता क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर कृषीमंत्रिपदाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यापुढे कोणताही बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशाराच फडणवीस यांनी यावेळी दिला आहे. तसेच जनतेत रोष असल्याने कोकाटेंच्या खातेबदलाचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

…म्हणून कोकाटेंकडून कृषीखातं काढून घेतलं

फडणवीस नागपुरात माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते. यावेळी बोलताना विधिमंडळाच्या सभागृहात जी घटना घडली त्यानंतर लोकांमध्ये एक रोष होता. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही सर्वांनी एकत्र चर्चा केली. या चर्चेअंती कोकाटे यांचे खातेबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना दुसरं खातं देण्यात आलंय. राज्याचं कृषीखातं हे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

कोणीही बेशीस्त वर्तन केले तर…

तसेच, आतातरी मंत्रिमंडळात दुसरा कोणताही बदल होणार नाही, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. त्यांनी यावेळी सर्वच मंत्र्‍यांना सूचक इशाराही दिला आहे. यापूढे कोणीही बेशीस्त वर्तन करेल तर खपवून घेतले जाणार नाही. थेट कारवाई होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

आपण जनतेची सेवा करायला आलो आहोत, म्हणून…

कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय हा सर्वांसाठीच महत्त्वाचा संकेत आहे. आपण या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत. जनतेची सेवा करताना आपण काय बोलतोय, आपण काय करतोय, आपलं वागण कसं आहे या सर्व गोष्टी जनता पाहात असते. त्यामुळे काळजी घेतलीच पाहिजे, अशा सूचनाही फडणवीस यांनी सर्व मंत्र्‍यांना दिल्या आहेत.

दरम्यान, खातेबदलाच्या या निर्णयानंतर दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या नेतृत्त्वाचे आभार मानले आहेत. दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.