टिटवाळाजवळील एका फार्म हाऊसवर गाणं लावण्यावरून झालेल्या वादामुळे एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिंदे गटाचा युवासेना पदाधिकारी विकी भुल्लर आणि त्याच्या आठ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांनी मिळून करण जाधव नावाच्या तरुणाला हॉकी स्टिक आणि हातोड्याने अमानुष मारहाण केली. ही घटना घडल्यानंतर आता आठवडा उलटला तरी, पोलीस एकाही आरोपीला पकडू शकलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहेत.
नेमकं काय घडलं?गटारी अमावस्येच्या दिवशी करण जाधव आपल्या मित्रांसोबत आदित्य फार्म हाऊसवर पार्टी करत होता. त्यावेळी रात्रीच्या वेळी गाणं लावण्यावरून त्यांचा दुसऱ्या एका गटाशी वाद झाला. यवेळी, उल्हासनगरमधील शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी विकी भुल्लर आपल्या साथीदारांसह तिथे पोहोचला. विकी भुल्लर आणि त्याच्या साथीदारांनी करण जाधव याला हॉकी स्टिक, लाकडी दांडके आणि हातोड्याने बेदम मारहाण केली. यात करण गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात करण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपींची नावे समोरया प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये विकी भुल्लर, त्याचे भाऊ हॅप्पी भुल्लर आणि सनी भुल्लर, तसेच मुकेश यादव, सचिन शेवाळे, मनी अण्णा, रमु आणि डॅनी यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी, पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. पोलिसांच्या या दिरंगाईमुळे पीडित कुटुंबाने आणि परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
लवकरात लवकर अटक कराकरणच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, विकी भुल्लर हा सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे पोलीस त्याला अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. राजकीय दबावामुळे पोलीस आरोपींची पाठराखण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जर सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कायद्याचा धाक नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. करण जाधवच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.