कोटाटेंचा पत्ता कट, कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? पडद्यामागे मोठ्या हालचाली; नेमकं काय घडतंय?
GH News July 31, 2025 07:14 PM

Dhananjay Munde : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळताना दिसल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार आहे. तशी शक्यता खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आता कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून घेतलं जाणार असल्यानं त्यांच्या खात्याची जबाबदारी नेमकी कोणावर सोपवली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे असतानाच आता माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे पुन्हा सक्रीय झाले आहेत. कृषीमंत्रीपद पुन्हा मिळावं, यासाठी धनंजय मुंडे यांनी लॉबिंग चालू केलं आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत.

नेमकं काय घडतंय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे खासदार तथा वरिष्ठ नेते सुनिल तटकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्याच्या निर्णयावर एकमत झाल्याचं बोललं जात आहे. लवकरच त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

मुंडे-फडणवीस यांच्यात बैठक

मुंडे कृषीमंत्री असताना त्या खात्यात आर्थिक गैरव्यवहार झाला, असा आरोप करण्यात आला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपांप्रकरणी क्लीनचीट दिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंडे कृषीखातं परत आपल्याला मिळावं, यासाठी प्रयत्न करत आहेत. 30 जुलैच्या रात्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली होती. ही भेट मात्र राजकीय नव्हती. मुंडे यांच्या मतदारसंघातील वेगवेगळ्या कामांसंदर्भात ते आले होते, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर आजही मुंडे आणि फडणवीस यांच्यात भेट झाली. आजच्या या बैठकीत अजित पवार हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे 30 जुलैपासून एकूण दोन वेळा फडणवीस आणि मुंडे यांच्यात बैठक झाली आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अजितदादांनी दिले होते संकेत

कृषी खात्यातील गैरव्यवहारासंदर्भात क्लीनचीट मिळाल्यानंतर अजित पवार यांनीही मुंडे यांच्या मंत्रि‍पदाबाबत सूचक वक्तव्य केले होते. मुंडे यांना एका प्रकरणात क्लीनचीट मिळाली आहे. आणखी एका प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत. त्याही प्रकरणात क्लीनचीट मिळाली तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यावर विचार करू, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर आता धनंजय मुंडे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. असे असले तरी धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात क्लीनचीट मिळालेली असली तरी अन्य प्रकरणांमुळे सध्यातरी त्यांच्यावर कृषीखात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता फार कमी असल्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.