ही धक्कादायक बातमी आयर्लंडमधून आहे. आयर्लंडमध्ये भारतीय वंशाच्या उद्योजकावर वर्णद्वेषी हल्ला करण्यात आला. माहितीनुसार, काही किशोरवयीन मुलांनी एका भारतीय वंशाच्या उद्योजकाचा चष्मा हा हिसकावून घेत त्याला मारहाण केली. नेमका काय प्रकार, याविषयीची माहिती पुढे वाचा.
आयर्लंडमध्ये राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या उद्योजकाने असा दावा केला आहे की, विनाकारण आपल्यावर वर्णद्वेषी हल्ला करण्यात आला. त्याने आरोप केला की, तो त्याच्या अपार्टमेंटजवळ फिरायला जात असताना काही किशोरवयीन मुलांनी त्याचा चष्मा हिसकावून घेतला आणि त्याला बेदम मारहाण केली.
आपल्यावरील हल्ला ही काही एकट्याची घटना नसून या युरोपियन देशात राहणाऱ्या बहुतांश भारतीयांसोबत सातत्याने होत आहे, असं मारहाण झालेल्या भारतीय वंशाच्या उद्योजकाने म्हटलं आहे.
असा झाला हल्ला
हल्ला झालेल्या भारतीय वंशाच्या संतोष यादव यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘’रात्रीचे जेवण आटोपून मी माझ्या अपार्टमेंटजवळ फिरायला जात असताना सहा किशोरवयीन मुलांच्या टोळक्याने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला. त्यांनी माझा चष्मा हिसकावून घेतला, तोडला आणि नंतर माझ्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर, हात-पायावर बेदम वार केले. त्यांनी मला रक्ताच्या थारोळ्यात फूटपाथवर पडून ठेवले. मी कसेबसे गार्डाला फोन केला आणि अॅम्ब्युलन्सने मला ब्लॅंचर्ड्सटाऊन हॉस्पिटलमध्ये नेले. वैद्यकीय पथकाने पुष्टी केली की माझ्या गालाला फ्रॅक्चर झाले आहे आणि मला आता तज्ज्ञ सेवेत पाठविण्यात आले आहे.’’
अल्पसंख्याकांवरील हिंसाचार
संतोष यादव यांनी दावा केला की, ‘’आयर्लंडमध्ये अल्पसंख्याकांवरील हिंसाचार झपाट्याने वाढत आहे. प्रशासन दोषींवर कोणतीही कारवाई करत नाही. गुन्हेगार येथे खुलेआम फिरत असून पुन्हा हल्ला करण्यासाठी आतुर आहेत.’’
या पोस्टमध्ये त्यांनी आयरिश सरकार, डब्लिनमधील भारतीय दूतावास, भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांच्यासह अनेक सरकारी यंत्रणांना टॅग केले आहे.
सोशल मीडियावर शेअर केले दोन फोटो
यादव यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये स्वतःचे दोन फोटो शेअर केले आहेत, त्यापैकी एका फोटोमध्ये त्यांच्या नाकातून आणि गालातून रक्त टपकताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत त्यांच्या हातात तुटलेला चष्मा दिसत आहे.