Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिंमडळातील रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्य सरकारवर टीका केली जात आहे. विरोधकांकडून त्यांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार आता त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी फडणवीस सरकार कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेणार आहे. तशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, खातेबदलाच्या चर्चेनंतर कोकाटे माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत. असे असतानाच आता त्यांनी खातेबदलाबाबत विचारताच फक्त दोन शब्दांची प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या दोन शब्दांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात पडद्यामागे नेमकं काय घडतंय? असं विचारलं जातंय.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्या खातेबदलाच्या चर्चेविषयी विचारणा केली. मात्र कोकाटे यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी फक्त ‘काही नाही’ असे दोन शब्द उच्चारत काढता पाय घेतला. कोकाटे -पुण्यातील सिम्बॉयोसिस कॉलेजच्या एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या खातेबदलाबाबत विचारलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार कोकाटे यांच्याकडचे कृषीखाते लवकरच काढून घेतले जाणार आहे. लवकरच याबाबतच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याआधी आज (31 जुलै) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते सुनिल तटकरे यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत कोकाटेंचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांना दुसरे खाते द्यावे, यावर या बैठकीत एकमत झाल्याचं बोललं जातंय.
कोकाटे कृषीमंत्री होण्याआधी या खात्याची जबाबदारी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर होती. मात्र मस्साजोगचे सरंपज संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच कृषी खात्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांमुळे त्यांनी राजीनामा दिला होता. आता मात्र त्यांना कृषी खात्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांत क्लीनचीट मिळाली आहे. त्यामुळे आता मुंडे पुन्हा एकदा कृषीमंत्रिपद मिळावं यासाठी लॉबिंग करत आहेत. त्यांनी 30 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आजदेखील त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी अजित पवार हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.