इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम सामना हा 31 ऑगस्टपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने या सामन्यात टॉस जिंकून भारताला फलंदाजासाठी भाग पाडलं आहे. या सामन्यात भारताने 23 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 73 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी हा पाचवा सामना करो या मरो असा आहे.
भारताला मालिका बरोबरीत राखण्यासाठी पाचव्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. मात्र या मैदानात भारतासाठी विजय मिळवणं आव्हानात्मक असणार आहे. भारताचे कसोटीत ओव्हलमधील आकडे निराशाजनक आहेत. त्यापलिकडे भारतासमोर आणखी एक आव्हान आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडियासाठी कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा शाप आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतीय संघाला आतापर्यंत विदेशात एकदाही कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात विजयी होता आलेलं नाही. टीम इंडियाने आतापर्यंत विदेशात एकूण 16 वेळा 5 सामन्यांची मालिका खेळली आहे. भारताला या 5 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात एकदाही विजय मिळवता आलेला नाही.
भारतीय संघाला 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 16 पैकी एकही वेळा अंतिम सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. भारताला 16 पैकी 10 वेळा पराभूत व्हावं लागलंय. तर 6 सामने भारताने अनिर्णित सोडवले. त्यामुळे आता भारतीय संघाकडे केनिंग्टन ओव्हलमध्ये विजय मिळवून हा डाग पुसण्याची संधी आहे.
भारतीय संघाला या मालिकेतील चारही सामन्यात बॅटिंगसाठी पूरक अशी खेळपट्टी मिळाली. मात्र ओव्हलमध्ये आतापेक्षा वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. “ओव्हलमधील खेळपट्टीवर गवत आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना त्याचा फायदा होऊ शकतो. इंग्लंडने खेळपट्टीनुसार प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकही पूर्णवेळ फिरकीपटूला संधी दिलेली नाही. इंग्लंड या सामन्यात 4 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली आहे. त्यापैकी 3 स्विंग करणारे आहेत”, असं शुबमनने 30 जुलैला पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
दरम्यान पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातून इंग्लंडचा कर्णधार आणि ऑलराउंडर बेन स्टोक्स याला खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. स्टोक्स नसणं भारतासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे भारत या संधीचा फायदा घेत धावांचा डोंगर उभारुन इंग्लंड विरुद्ध विजय मिळवून पाचवा सामना न जिंकण्याचा डाग पुसून काढणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.