शास्त्रीय गायन स्पर्धेत सावली गांवकर प्रथम
esakal July 31, 2025 11:45 PM

- rat३१p१९.jpg-
२५N८११६४
रत्नागिरी : कोकणस्वर प्रतिभा गायन स्पर्धेतील विजेते सावली गांवकर, गार्गी सिद्धये, श्रीयश परब यांच्यासमवेत मान्यवर.

शास्त्रीय गायन स्पर्धेत गांवकर प्रथम
कोकणस्वर प्रतिभा स्पर्धा; मुक्ता, वेदिकाचे उत्तम सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : स्वस्तिक-पणजी आयोजित पहिल्या कोकणस्वर प्रतिभा या लहान मुलांसाठी (वय ५ ते १३) शास्त्रीय गायन स्पर्धेत गोव्याची सावली गांवकर हिने ३३ हजार ३३३ रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. ही स्पर्धा पणजी येथील झी स्क्वेअर सभागृहात झाली. अंतिम फेरीत रत्नागिरीतील मुक्ता गोगटे व वेदिका गांधी यांनीही दर्जेदार सादरीकरण केले.
लहान मुलांमध्ये शास्त्रीय संगीताची ओढ निर्माण होण्यासाठी व त्यांना अभिजात संगीताकडे आकर्षित करण्यासाठी आणि हा शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा नवीन पिढीपर्यंत पोचवण्यासाठी या स्पर्धेचे खास आयोजन केले होते. स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. सुरुवातीची फेरी ही ऑनलाइन पद्धतीने घेऊन त्यातले १६ स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले होते.
कोकणस्वर प्रतिभा या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक गोव्याची गार्गी सिद्धये हिने पटकावला असून, तिला २२ हजार २२२ रुपये मिळाले. तर तृतीय पारितोषिक गोव्याच्याच श्रीयश परबला मिळाले असून, ११ हजार १११ रुपये मिळवले आहेत. उत्तेजनार्थ पारितोषिके रायगडच्या अद्वितीय भट्टाचार्यला ५ हजार ५५५ रुपये व गोव्याच्या समर्थ भटला ५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण पल्लवी पाटील, अर्चना कामुलकर व नम्रता जोशी यांनी केले. उद्योजक अनिल खंवटे, विनयकुमार मंत्रवादी, डॉ. अजित म्हापणे, मंगेश गांवकर व दत्तदीप गावस यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे निवेदन नेहा उपाध्ये हिने केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.