सांगोला : नीरा उजवा कालव्याच्या फाटा क्रमांक पाचला २२५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, येत्या पाच ते सहा दिवसांत लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांपर्यंत पाणी पोहोचणार आहे. त्यानंतर चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरला जाणार असल्याची माहिती माजी आमदार ॲड. शहाजी पाटील यांनी दिली.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या नीरा व देवघर धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर फाटा क्रमांक पाचला पाणी सोडण्यात यावे व चिंचोली तलाव भरावा, अशी मागणी ॲड. शहाजी पाटील यांनी केली होती.
या मागणीची तत्काळ दखल घेत जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी २७ जुलैपासून फाटा क्रमांक ५ ला २२५ क्युसेकने पाणी सोडण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे योजनेतील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचेल व चिंचोली तलावही पूर्ण क्षमतेने भरेल. या पाण्यामुळे चिंचोली तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होणार आहे.