मोठी बातमी! शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता काँग्रेसच्या वाटेवर
GH News August 03, 2025 07:16 PM

गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आधी एकनाथ शिंदेंनी बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अजित पवारांनीही राष्ट्रावादीतील अनेक आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यानंतर बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केल्याचे समोर आले आहे. खासकरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बरेच नेते सत्ताधारी पक्षांमध्ये सामील झाल्याचे पहायला मिळाले आहे. अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

बाबाजानी दुर्रानी

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे परभणीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुर्रानी आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते येत्या 7 तारखेला मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे. दुर्राणी यांच्या समर्थकांकडून 7 तारखेला काँग्रेस पक्षप्रवेश होणार असल्याचे बॅनर्स सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे परभणीत शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

माजी आमदार बाबाजानी दुर्रानी हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याआधी ते अजित पवारांच्या राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र काही कारणांमुळे हा प्रवेश रखडल्यामुळे दुर्राणी यांच्या काँग्रेस नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.

मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

माजी राज्यमंत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि परभणी जिल्ह्यातील नेते सुरेश वरपूडकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता बाबाजानी दुर्रानी यांना काँग्रेस मध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या पदाची माहिती समोर येणार आहे.

बाबाजानी दुर्राणी कोण आहेत?

बाबाजानी दुर्राणी 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं होतं. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे अजित पवारांसोबत गेले होते. मात्र काही काळानंतर ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले होते. त्यानंतर आता ते शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसचा हात हातात घेण्याच्या तयारीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.