सर्वात मोठी राजकीय घडामोड, उद्धव ठाकरेंचा 3 दिवस दिल्ली दौरा; इंडिया आघाडी घेणार मोठा निर्णय
GH News August 03, 2025 07:16 PM

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसीय दिल्ली दौरा करणार आहेत. येत्या ६ ते ८ ऑगस्टदरम्यान उद्धव ठाकरे दिल्लीत असणार आहेत. या काळात ते इंडिया आघाडीच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

७ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक

येत्या ७ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेमध्ये आगामी बैठकीच्या रणनीतीवर आणि संभाव्य विषयांवर विचारविनिमय झाल्याचे सांगितले जात आहे. इंडिया आघाडीच्या एकजुटीसाठी ही भेट आणि चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवरही चर्चा

तसेच उद्धव ठाकरे यांचा हा दौरा केवळ राजकीय बैठकांपुरती मर्यादित नसून ते दिल्लीमध्ये काही इतर महत्त्वाच्या व्यक्तींनाही भेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा विशेष लक्षवेधी ठरला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरे आपली भूमिका स्पष्टपणे मांडतील. तसेच महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवरही चर्चा करतील, अशी शक्यता आहे. या बैठकीत भाजपविरोधी एकजूट अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

आघाडीची पुढील दिशा ठरणार

यामध्ये जागावाटप, प्रचाराची रणनीती आणि समान किमान कार्यक्रमावर चर्चा होईल, असे बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीत मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे विरोधकांची बाजू अधिक प्रभावीपणे मांडली जाण्याची आशा आहे. उद्धव ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्यातून काय निष्पन्न होते आणि आघाडीची पुढील दिशा कशी ठरते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.