मोठी बातमी! आता प्रत्येक तालुक्यात मिळणार वाहन परवाने; 'आरटीओ'कडून तालुकानिहाय वेळापत्रक; लर्निंग काढल्यावर ६ महिन्यात काढावे लागते पक्के लायसन्स
esakal August 04, 2025 12:45 PM

तात्या लांडगे

सोलापूर : वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत, दुचाकी, चारचाकी घ्यायचे नियोजन केले असेल तर अगोदर वाहनाचा परवाना काढावा लागेल. सोलापूरच्या आरटीओ कार्यालयात येऊन त्यासाठी रांगेत उभारायला लागू नये म्हणून आठवड्यातील प्रत्येक दिवशी तालुकानिहाय वाहन परवान्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्याठिकाणी दरमहा १८० शिकाऊ परवाने आणि २४० पक्के परवाने दिले जात आहेत.

वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहन हाती असलेल्या चालकास पूर्वी ५०० रुपयांचा दंड होता. आता पाच हजार रुपयांचा दंड केला जातो. तसेच अल्पवयीन मुला-मुलींच्या हाती वाहन असेल तर १० हजार रुपयांचा दंड आणि वाहन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल होतो. तो खटला कोर्टात पाठविला जातो. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाकडे गाडी चालविण्याचा परवाना आवश्यकच आहे. पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, मंगळवेढा या तालुक्यातील वाहनधारकास लायसन्स काढण्यासाठी खूप लांबून यायला लागू नये, यासाठी त्यांच्याच तालुक्यांमध्ये पूर्वीपासून परवान्याचे कॅम्प आयोजित होतात. त्यातून वाहनधारकांची सोय झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी सांगितले.

लर्निंग परवाना काढलेल्यांना सहा महिन्याच्या मुदतीत पक्क्या परवान्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यांना ठरावीक दिवस दिला जातो. त्या दिवशी त्या वाहनधारकास दुचाकी, चारचाकी वाहन चालवायला येते की नाही, हे पडताळले जाते. त्यात उत्तीर्ण ठरलेल्यांना काही दिवसात पक्का परवाना दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.

लायसन्सचे वेळापत्रक असे...

  • पहिले तीन सोमवार : मंगळवेढा

  • शेवटचा सोमवार : मंद्रूप-बोरामणी

  • प्रत्येक मंगळवार, बुधवार : पंढरपूर

  • प्रत्येक गुरुवारी : बार्शी

  • पहिला व तिसरा शुक्रवार : अक्कलकोट

  • दुसरा व चौथा शुक्रवार : मोहोळ

लर्निंग लायसन्सची मुदत सहा महिने

अठरा वर्षे पूर्ण झालेला कोणताही व्यक्ती वाहन चालविण्याच्या लर्निंग (शिकाऊ) लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो. त्यावेळी अर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, वीजबिल किंवा टॅक्स पावती अशी कागदपत्रे लागतात. लर्निंग लायसन्ससाठी काही प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट (चाचणी) घेतली जाते. त्यात उत्तीर्ण झालेल्या अर्जदाराला लर्निंग लायसन्स मिळते. पण, त्याची मुदत सहा महिन्यांपर्यंतच असल्याने तत्पूर्वी त्या अर्जदार वाहनधारकाने पक्क्या लायसन्ससाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.