अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत आहेत. 25 टक्के टॅरिफ असो किंवा भारत-पाकिस्तान सीजफायरच श्रेय, मोदी सरकार कसं अडचणीत येईल हाच ट्रम्प यांचा प्रयत्न दिसून आला आहे. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला ते पाकिस्तानच भरभरुन कौतुक करतायत. अमेरिकेने पाकिस्तानसोबत त्यांचं तेल भंडार विकसित करण्याचा करार केला आहे. एकदिवस भारतही पाकिस्तानकडून तेल विकत घेईल असं नुकतच ट्रम्प म्हणाले. ट्रम्प सध्या ज्या पाकिस्तानच गुणगान करतायत, त्याच पाकिस्तानने इराणसोबत महत्त्वाचे करार केले आहेत. इराण हा अमेरिकेचा कट्टर शत्रू आहे. जून महिन्यात अमेरिकेने इराणमध्ये एअर स्ट्राइक केला होता. पाकिस्तान अनुकूल भूमिका घेऊन भारताला डिवचणारे ट्रम्प आता यावर काय बोलणार?.
इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान सध्या दोन दिवसाच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. रविवारी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान आणि पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यात इस्लामाबादमध्ये बैठक झाली. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत 12 MOU वर स्वाक्षरी करण्यात आली. दोन्ही देशांनी व्यापार 8 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा करार केला आहे. याआधी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया, चीन आणि इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना धमकी दिली आहे. आता सर्वांची नजर ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेवर आहे.
समर्थनाबद्दल मानले आभार
बैठकीनतंर पत्रकार परिषद झाली. त्यात पेजेशकियन म्हणाले की, “लवकरच आम्ही इराण आणि पाकिस्तानमधील 3 अब्ज डॉलरचा व्यापार 10 अब्ज डॉलरपर्यंत नेऊ. इस्रायलविरुद्ध 12 दिवस चाललेल्या युद्धात इराणच समर्थन केल्याबद्दल त्यांनी आभार मानले”
उच्चस्तरीय बैठक
या बैठकीला पाकिस्तानचे वाणिज्य मंत्री जाम कमाल खान आणि इराणी उद्योग, खाण आणि व्यापार मंत्री मोहम्मद अताबक उपस्थित होते. खान आणि अताबक यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय चर्चेत व्यापाराचा वेग वाढवणं, सीमा संबंधी अडथळे दूर करणं या विषयी चर्चा झाली.
कराराचा फायदा उचलण्याची गरज
वाणिज्य मंत्री जाम कमाल खान म्हणाले की, “जर पूर्णपणे या करारांचा फायदा उचलला तर येणाऱ्या वर्षांमध्ये पाकिस्तान आणि इराणमधील द्विपक्षीय व्यापार सहज 5 ते 8 अब्ज डॉलरच्या पुढे जाऊ शकतो”
सध्या किती अब्ज डॉलरचा व्यापार?
तेहरानवरुन रवाना होण्यापूर्वी पेजेशकियन म्हणालेले की, “इराण आणि पाकिस्तानने नेहमीच चांगले, प्रामाणिक आणि घट्ट संबंध राहिले आहेत” वार्षिक द्विपक्षीय व्यापाराला 10 अब्ज डॉलरपर्यंत चालना देण्याची योजना आहे, असं ते म्हणालेले. सध्या इराण आणि पाकिस्तानमध्ये 3 अब्ज डॉलरचा व्यापार आहे.