अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाच सामन्याची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली आहे. ही मालिका बरोबरीत सोडवल्याने भारताचं कौतुक होत आहे. लॉर्ड्स कसोटी मालिका 22 धावांनी गमवली नाही तर ही मालिका भारताने 3-1 ने जिंकली असती. यामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. भारताची विजयी टक्केवारी झपाट्याने वाढली आहे. दुसरीकडे, इंग्लंडला या पराभवामुळे फटका बसला आहे. चौथ्या कसोटीत स्लो ओव्हर रेटसाठी 2 गुण कापले होते. त्यात शेवटच्या सामन्यात पराभव यामुळे चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात तिन्ही सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे 36 गुण असून विजयी टक्केवारी 100 आहे. तर श्रीलंकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. त्यामुळे 16 गुण आणि विजयी टक्केवारी 66.67 टक्के आहे. भारतीय संघ तिसऱ्या स्थानी असून 28 गुण आणि विजयी टक्केवारी ही 46.67 टक्के झाली आहे. तर इंग्लंडने पाचवा कसोटी सामना गमावल्याने 26 गुणांसह विजयी टक्केवारी ही 43.33 टक्के आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावर आहे. तर बांगलादेशचा संघ पाचव्या स्थानी असून 4 गुण आणि विजयी टक्केवारी 16.67 टक्के आहे. त्यात वेस्ट इंडिजने तीन पैकी तीन सामने गमवल्याने शून्य गुणांसह शेवटच्या स्थानी आहे. तर दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान यांनीही एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 5 गडी राखून पराभूत केलं. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅक केलं आणि इंग्लंडला 336 धावांनी पराभवाची धूळ चारली. तिसरा सामना अतितटीचा झाला. हा सामना भारताने अवघ्या 22 धावांनी गमावला. चौथ्या सामन्यात भारताने जबरदस्त झुंज दिली. इंग्लंडने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती. पण भारतीय खेळाडूंनी दोन दिवस फलंदाजी करून सामना ड्रा केला. पाचव्या कसोटी सामनाही अतितटीचा झाला. भारताने या सामन्यात सामन्यात निसटता विजय मिळवला. अवघ्या 6 धावांनी इंग्लंडला पराभूत केलं आणि विजयाची चव चाखली.