Engineering Admission 2025: केवळ २२.५४ टक्केच प्रवेश निश्चित; अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीला अल्प प्रतिसाद
esakal August 05, 2025 10:45 PM

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी-पालक प्रतीक्षेत होते. मात्र, राज्यात बी.ई. आणि बी.टेक. अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत एक लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले, असे असतानाही केवळ २२.५४ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापित संस्था, विद्यापीठांतर्गत विभाग, विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (बी.ई आणि बी.टेक) अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत दोन लाख १७ हजार ३३० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यातील एक लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम देऊन अर्ज निश्चित केला आहे.

सीईटी कक्षाच्या वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात पहिल्या फेरीत अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे फेरीदरम्यान प्रवेशासाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार बी.ई./बी.टेक प्रवेशासाठी सोमवारी सायंकाळपर्यंत केवळ ३२ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे, अशी माहिती सीईटी कक्षाने दिली आहे.

बी.ई / बी.टेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश

  • ‘कॅप’ प्रवेश फेरीसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : २,१७,३३०

  • प्रवेश फेरीसाठी अर्ज निश्चित केलेले विद्यार्थी : १,९९,७४८

  • ‘कॅप’च्या पहिल्या फेरीत प्रवेशासाठी

  • महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी : १,४४,७७६

  • आतापर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश

  • निश्चित केलेले विद्यार्थी : ३२,६३५

‘चार ते पाच टक्केच प्रमाण’

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई म्हणाले, ‘‘अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत दरवर्षी साधारणत: १५ ते १७ टक्केच विद्यार्थी प्रवेश निश्चित करतात.

Nagpur News: नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त होऊन नरखेड तालुक्यातील ५३ वर्षीय शेतकऱ्याने संपवल जीवन

पहिल्या फेरीत चांगले गुण असणारे आणि पसंतीचे महाविद्यालय असणारे बहुतांश विद्यार्थी प्रवेश निश्चित करतात. त्यात प्रवेश प्रक्रियेसाठी आणखी प्रतीक्षा नको करायला, म्हणून प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही चार ते पाच टक्के असते. उर्वरित विद्यार्थी पसंती महाविद्यालय आणि पसंतीची अभ्यासक्रम मिळावा, यासाठी आग्रही असल्याने आणखी चांगले पर्याय मिळावेत, म्हणून पहिल्या फेरीत प्रवेश घेत नाहीत. असे विद्यार्थी पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये पसंतीनुसार महाविद्यालय आणि अभ्यासक्रम मिळण्यासाठी प्रतीक्षा करतात, असे प्रवेशाच्या आकडेवारीतील निरीक्षणातून दिसून येते.’’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.