तात्या लांडगे
सोलापूर : अकलूज येथील नवीन बसस्थानकावरून इंदापूरमार्गे पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी नूपुर अनुप शहा (वय ३८, रा. वाकड, पुणे) यांच्या पर्समधील सोन्याचे गंठण, दोन बांगड्या व एक पाटली, असा एकूण दोन लाख ९६ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरला होता. ४ ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही चोरी झाली होती. अकलूज पोलिसांनी २४ तासांतच चोरीचा छडा लावून दागिने हस्तगत केले आहेत. संशयित आरोपी महिला ५० टक्के सवलतीत तिकीट काढून प्रवास करायच्या, अशी बाब पुढे आली आहे.
नूपुर शहा पुण्याला निघाल्या होत्या. त्यासाठी अकलूज बस स्थानकावरून त्या इंदापूरला जाणाऱ्या गाडीत चढत होत्या. त्यावेळी गर्दीत चार महिलांनी नूपुर शहा यांच्या पर्समधील दागिने लंपास केले होते. गुन्ह्याच्या तपासासाठी अकलूज पोलिसांनी बस स्थानकासह स्थानकातून बाहेर पडणाऱ्या मार्गावरील ३५ सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले. त्यात चौघी रिक्षातून टेंभुर्णीकडे जाताना दिसल्या. पोलिसांनी संशयित महिलांचा शोध सुरू केला आणि टेंभुर्णी परिसरात त्या महिला सापडल्या. त्यांना अटक करण्यात आली असून एकता कैलास उपाध्य (वय २४), ननिता दिनेश कांबळे (वय ३५), सुनीता शाखा सकट (वय ४५) व आरती मेघराज उपाध्य (वय ३०) या येरवडा (जि. पुणे) येथील फुले नगरातील रहिवासी आहेत.
त्यांच्यावर यापूर्वी आळंद, कर्नाटक, वाई (सातारा), वारजे माळेवाडी, शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची बाब तपासात समोर आली आहे. या गुन्ह्यातील १४ लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. उद्या (बुधवारी) त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक प्रीतम यावलकर, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नीरज उबाळे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, विक्रम साळुंखे, उपनिरीक्षक संजय रेगुडे यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली.
चोरी करून खासगी वाहनाने निघून जायच्या
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना महिलांसाठी ५० टक्के सवलत आहे. त्यामुळे चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या महिला बसमधूनच यायच्या आणि चोरी करून खासगी वाहनाने किंवा दुसऱ्या बसमधून निघून जायच्या, अशी बाब तपासात समोर आली आहे.