Mumbai Crime: सावधान! चार आण्याचे नाणे द्या अन् सहा लाख घ्या, फसव्या जाहिरातीचे मुंबईकरांवर जाळे
esakal August 06, 2025 07:45 AM

मुंबई : चार आण्याचे जुने नाणे आणि सिरीयल क्रमांकाच्या अखेरीस ७८६ आकडा असलेल्या जुन्या शंभर रुपयांच्या नोट विकल्यास प्रत्येकी सहा लाख देऊ, या फसव्या जाहिरातीला भुललेल्या मुंबईतील एका महिलेने तब्बल साडेआठ लाख रुपये गमावले. या प्रकरणी सोमवारी पायधुनी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला.

फसवणुकीचीही पद्धत नवी नाही. दोन वर्षांपूर्वी अशा फसव्या जाहिरातींना पेव फुटले होते. मोठ्या रक्कमेच्या परताव्याला भुलून अनेकांनी लाखो रुपये गमावले होते. तेव्हा रिझर्व्ह बँकेने अलर्ट जारी करून जुन्या नोटा, नाणी चढ्या भावात विकत घेण्याची आपली योजना नसून अशा फसव्या जाहिरातीना बळी पडू नये, असे आरबीआयने स्पष्ट केले होते.

Best Employees Morcha: बेस्ट सेवानिवृत्त कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा, काय आहेत मागण्या?

या प्रकरणात माझगाव येथे राहणाऱ्या आणि खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या महिलेने ८ जुलै रोजी फेसबूकवर एक जाहिरात पाहिली. त्यात चार आण्याचे(गेंड्याचे चित्र असलेले) जुने नाणे किंवा ७८६ आकडा असलेली शंभर रुपयांची जुनी नोट असल्यास ती आम्ही प्रत्येकी सहा लाख रुपयांना विकत घेऊ,असे या जाहिरातीत नमूद होते.

तक्रारदार महिलेकडे नाणे होते. सहा लाख मिळणार, या मोहापायी तिने तातडीने जाहिरातीतील संपर्क क्रमांकांवर फोन केला. आपल्याकडे नाणे असून ते विकायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव राज गियानी असे सांगितले.

श्रावण पौर्णिमेलाच रक्षाबंधन सण का साजरा केला जातो?

ही व्यक्ती चारआण्याच्या नाण्याच्या बदल्यात सहा लाख रुपये देण्यास मंजूर झाली. मात्र त्या आधी नोंदणी फी, जीएसटी शुल्क अशी वेगवेगळी कारणे पुढे करत ८.४६ लाख ४६ उकळले. नाण्याचे सहा लाख रुपये खात्यावर जमा होतील, असे सांगणाऱ्या राज नावाच्या व्यक्तीने तक्रारदार महिलेशी संपर्क तोडला. तेव्हा या महिलेला फसवणूकझाल्याचे लक्षात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.