महादेवी हत्तीणीसंदर्भात 'वनतारा'सोबत चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
BBC Marathi August 06, 2025 06:45 PM
Vantara/Instagram महादेवी वनतारामध्ये पोहचली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवी हत्तीणीबाबत 'वनतारा'शी चर्चा केली.

देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती दिली की, "वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे."

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, "या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता."

तसंच, "कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले," अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

आतापर्यंत काय काय घडलं?

महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलनं होत आहेत तसेच राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवी पुन्हा यावी यासाठी सुप्रीम कोर्टात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असे सांगितले आहे.

"माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल," असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नांदणी मठ येथील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली.

फडणवीस म्हणाले की, "गेल्या 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. माधुरी पुन्हा मठात यावी ही जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल. मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य शासनाचाही समावेश करावा. तसेच वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. यामध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्द्यांचे निराकरण करण्यात येईल.

"हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य शासन एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्या प्रमाणे सुविधा देण्यात येतील आदी बाबींचा समावेश करून या बाबी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही राज्य शासनामार्फत या याचिकेमध्ये करण्यात येईल," असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आतापर्यंत या प्रकरणात काय झाले हे आपण पाहू.

वनताराने प्रसिद्ध केले निवेदन

नांदणी येथील हत्तीण महादेवी (माधुरी) साठी कोल्हापूर परिसरात तीव्र आंदोलन सुरू आहे. सोशल मीडियावर, तसेच रस्त्यावर येऊन लोक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या घडामोडी नंतर वनताराने निवेदन दिले असून महादेवीची योग्य ती काळजी घेत असल्याचे वनतारा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबत पूर्ण सहानुभूती बाळगतो असे वनताराने म्हटले आहे. जनतेनी संघर्ष करू नये तर आमच्यासोबत राहावे असे आवाहन देखील वनताराने केले आहे.

28 जुलैला कोल्हापूरपासून साधारण 35 किलोमीटर असलेल्या नांदणी गावात जे घडलं, ते क्वचितच इतर कोणत्या गावात कधी घडलं असेल, वा तुम्ही ऐकलं असेल. जवळपास सगळं गाव रस्त्यावर आलं होतं. हेच गाव कशाला, भोवतालच्या पंचक्रोशीतले लोकही जमेल तसं आले होते.

BBC

सगळे भावूक होते. काहींच्या डोळ्यात अश्रू होते. हा एक निरोपाचा कार्यक्रम होता आणि तो निरोप एका 'महादेवी' नावाच्या हत्तीणीला दिला जात होता. कारण ती गुजरातच्या 'वनतारा' या संगोपन केंद्रामध्ये चालली होती.

नांदणी गावची ही 'महादेवी' हत्तीण आता गुजरातमधील वनतारामध्ये सुरक्षितपणे पोहचली असल्याचं, वनतारा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पण 'महादेवी' आणि गावकऱ्यांच्या ताटातुटीचा हा प्रवास इतका सोपा नव्हता.

खरंतर माणूस आणि प्राण्यांच्या नात्यांच्या अनेक गोष्टी आपण पूर्वी ऐकल्या असतील. पण अशी गोष्ट कदाचित पहिल्यांदाच ऐकायला मिळेल. निरोपावेळच्या या भावना केवळ ताटातुटीच्या नव्हत्या, तर त्या संघर्षातूनही आल्या होत्या.

या गावानं त्यांच्या घरातल्यांपैकीच एक असणाऱ्या या हत्तीणीला गावातच राहण्यासाठी कोणतेही प्रयत्न करायचे सोडले नाहीत.

कधी रस्त्यांवर येऊन आंदोलनं केली, कधी सरकारी यंत्रणेशी दोन हात केले आणि शेवटी तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले. पण 33 वर्षांच्या या नात्यात अखेर आता दुरावा आला.

SCREEN GRAB

ही गोष्ट आहे शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावाची आणि या गावच्या 'महादेवी' हत्तीणीची. तिला काही जण 'माधुरी'ही म्हणायचे. 1992 सालापासून ती या गावातल्या जैन समाजाच्या मठात वास्तव्याला होती.

पण, आता एक मोठ्या वादानंतर आणि न्यायालयीन संघर्षानंतर या 'महादेवी' हत्तीणीला 33 वर्षांपासूनचं घर सोडावं लागलं आणि गुजरातच्या दिशेला प्रयाण करावं लागलं.

वन्यप्राण्यांसाठी असलेली विशेषाधिकार समिती, उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी होऊन 28 जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला.

त्यानुसार या हत्तीणीला गुजरातच्या जामनगर इथं असलेल्या अंबानींच्या 'रिलायन्स फाऊंडेशन' च्या 'वनतारा' या संगोपन केंद्रात जावं लागलं.

कोल्हापूरच्या नांदणीतून लगेचच वनविभाग आणि 'वनतारा'च्या कर्मचाऱ्यांनी जामनगरला नेऊन 'वनतारा'चाच भाग असणाऱ्या 'राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट'च्या अखत्यारित दिलं.

'महादेवी' ऊर्फ 'माधुरी'चं नांदणीशी असलेलं नातं

शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावात अनेक शतकांपासून जैन समाजाचा 'स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ' आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक इथल्या मुख्यत्वे सीमाभागातल्या 743 गावांतले भाविक या मठाशी जोडले गेले आहेत. या मठाच्या मुख्य स्वामींवर त्यांची श्रद्धा असते.

या मठाकडे 'महादेवी' हत्तीणीचं पालकत्व होतं आणि शेवटपर्यंत याचिकाकर्ते म्हणून मठानं सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली. इथल्या अनेक धार्मिक परंपरांमध्ये हत्तीचा कायम सहभाग वर्षानुवर्षं राहिला आहे असं या मठाचं म्हणणं आहे.

सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या याचिकेत मठातर्फे असं सांगण्यात आलं की, "जवळपास 1300 वर्षांपासून असलेल्या या मठात पूर्वीपासून हत्ती असण्याची परंपरा आहे. इथं कायम एक हत्ती असतोच आणि त्याची व्यवस्थित देखभालही केली जाते."

याच परंपरेनुसार 1992 साली इथं सध्या चर्चेत असलेल्या या हत्तीणीला आणलं गेलं आणि तिचं नाव 'महादेवी' असं ठेवलं गेलं. तिला इथं 'माधुरी'ही म्हटलं जायचं. मठ आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती गावकऱ्यांमध्ये मिसळून गेली होती.

इथल्या सगळ्या धार्मिक विधी आणि मिरवणुकांमध्ये 'महादेवी'ला मिरवलं जायचं. इथल्या पंचक्रोशीसाठी ती नांदणी गावची ओळख बनली होती.

मठानं शतकानुशतकं जिवंत ठेवलेल्या एका परंपरेची सध्याची प्रतिनिधी म्हणून तर तिला महत्त्वं होतचं, पण इतर वेळेसही तिला गावकरीच समजलं गेलं.

'महादेवी'शी जोडलेल्या याच भावना जेव्हा तिला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा उफाळून आल्या होत्या.

तिच्या निरोप सभारंभची एक मिरवणूकच इथून निघाली. तिला गावातच थांबवण्यासाठी गेले काही वर्षं सुरू असलेल्या संघर्षामुळे त्या भावनांना अधिकच धार चढलेली होती. ती अनावर झाल्यामुळे या निरोपावेळेस स्थानिक पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

SCREEN GRAB

हे केवळ निरोपावेळेसच झालं असं नाही, तर त्याअगोदर काही दिवस 16 जुलैला जेव्हा उच्च न्यायालयाचाही मठाच्या याचिकेविरुद्ध निकाल आला, तेव्हाही झालं. या हत्तीणीला लगेचच गुजरातला नेत आहेत अशी बातमी पसरली आणि आजूबाजूच्या गावातले शेकडो लोक रस्त्यावर आले.

त्यांना 'महादेवी'ला घेऊन जाणारा रस्ता अडवायचा होता. या हत्तीणीशी जोडली गेलेली अशी ही प्रेमाची आणि त्यातून आलेल्या रागाची भावना होती.

वातावरण इतकं तापलं की राजकीय नेत्यांनाही यात पडावं लागलं, आणि काही नेत्यांनी मौन पत्करणंही पसंत केलं.

"ही अनेक वर्षांची परंपरा होती. इथं कधीही हत्तीला अगोदरही त्रास झाला नाही. लोकांच्या भावना तिच्याशी जोडलेल्या आहेत. असं असतांना आपल्याला हत्ती मिळत नाही म्हणून कायद्याचा धाक दाखवून तो अशा प्रकारे घेऊन जाणं बरोबर नाही," अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

कायद्याची लढाई आणि 'वनतारा'ची एन्ट्री

चालू परंपरेनुसार 'महादेवी' ऊर्फ 'माधुरी'ही हत्तीण नांदणीच्या मठात असतांना तिच्या गुजरातला नेण्याचा संघर्ष 2020 च्या आसपास सुरु झाला.

वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी आणि हक्कांसाठी काम करणा-या 'पेटा' (People for the Ethical Treatment of Animals) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या हत्तीणीची मठात योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार वन्यप्राण्यांच्या देखभाल आणि हस्तांतरणासाठी असलेल्या दिल्ली येथील 'उच्चाधिकार समिती'कडे केली.

मठाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्याप्रमाणे, "डिसेंबर 2023 मध्ये या उच्चाधिकार समितीनं या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षक यांना ही हत्तीण गुजरातला 'वनतारा'चाच भाग असणाऱ्या 'राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट' कडे हस्तांतरित करण्याविषयी सुचवलं."

एप्रिल 2024 मध्ये नांदणीच्या मठानं उच्चाधिकार समितीच्या आदेशाविरोधाअत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांची याचिका दाखल करुन घेत न्यायालयानं या हत्तीणीला गुजरातला हलवण्याला स्थगिती दिली.

त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार मोठा काळ तज्ज्ञ समिती, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासण्या, पाहणी सुरू राहिली. मठाचा दावा आहे की, या काळात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात या हत्तीणीची तब्येत सुधारत असल्याचे आणि 'हेल्थ सर्टिफिकेट' वेळोवेळी समिती आणि न्यायालयासमोर दाखल केली आहेत.

मात्र, 16 जुलैला उच्च न्यायालयाच्या नांदणीच्या मठाच्या ट्रस्टची ही याचिका निकाली काढत 3 जून 2025 रोजी उच्चाधिकार समितीनं ही हत्तीण गुजरातला नेण्याच्या निर्णय कायम ठेवला.

त्यानुसार 'महादेवी'ला 'वनतारा'चा भाग असलेल्या 'राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट' कडे हस्तांतरित करण्याचा आदेशही दिला.

'स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठा'च्या ट्रस्टनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण तिथंही त्यांच्या हाती यश आलं नाही.

28 जुलैला सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये 'महादेवी' हत्तीणीला गुजरातला अंबानींच्या 'वनतारा'त नेण्यात आलं.

अनेक प्रश्न

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर 'महादेवी' ऊर्फ 'माधुरी' ही हत्तीण गुजरातला तर गेली, पण ती गावातच असावी यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्यांना अजूनही काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं ते शोधत आहेत.

"ही जी उच्चाधिकार समिती आहे, माजी न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या नेतृत्वात, ती काही संवैधानिक नाही. ते केवळ सुचवू शकतात. वन्यजीव कायद्याप्रमाणं जबाबदारी ही वन्यजीव संरक्षक (वॉर्डन) यांची आहे.

पण त्यांनी केवळ 'पेटा'नं केलेल्या तक्रारीवर या समितीनं गुजरातला नेण्याचा आदेश काढला. वनविभागानंही त्याला हो म्हटलं," न्यायालयात नांदणीच्या मठाची बाजू मांडणारे ॲडव्होकेट आनंद लांडगे 'बीबीसी मराठी'शी बोलताना सांगतात.

SCREEN GRAB

'स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ' ट्रस्टचे विश्वस्त सागर शंभूशेटे विचारतात की, "हे 1300 वर्षं प्राचीन मठसंस्थान आहे. हत्ती सांभाळायची परंपरा 400 वर्षांपासून आहे. ही हत्तीण 33 वर्षांपासून इथं आहे. गेली अनेक वर्षं चांगले पशुवैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ हत्तीकडे लक्ष देत होते. कोणताच प्रश्न नव्हता.

जेव्हा उच्चाधिकार समितीनं सांगितल्यानुसार वेगवेगळ्या पाहण्या झाल्या, त्यांनीही जे सुचवलं, ते आम्ही केलं. पण तरीही असा निर्णय आला. आम्ही कायदा पाळणारे आहोत. पण एकाच खाजगी ट्रस्टकडे हा हत्ती देण्यात आला? महाराष्ट्राची ही वनसंपत्ती होती, ती वाचवण्यासाठी महाराष्ट्रानं काही का नाही केलं?"

दुसरीकडे 'पेटा' संस्थेनं, ज्यांच्या मूळ तक्रारीवर 'महादेवी' या हत्तीणीचा ताबा नांदणीच्या मठाकडून काढून घेऊन 'वनतारा' कडे देण्यात आला, त्यांनी या हस्तांतरणानंतर काढलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे की, या हत्तीणीला ज्या अवस्थेत ठेवण्यात आलं होतं ती भयानक होती आणि आता तिची सुटका झाली आहे.

"'महादेवी'ला जवळपास 33 वर्षांपासून या संस्थानाच्या मठात जणू कैदेत ठेवण्यात आलं होतं. काँक्रिटच्या जमिनीवर तिला साखळदंडांनी बांधण्यात यायचं आणि त्यामुळे तिची तब्येत खालावली होती," 'पेटा'च्या या पत्रकात म्हटलं आहे.

'पेटा'नं या पत्रकार असंही म्हटलं आहे की जेव्हा ते या हस्तांतरणासाठी नांदणी गावात गेले होते तेव्हा त्यांच्या चमूवर दगडफेकही झाली.

" 'महादेवी' ही एकटी साखळ्यांमध्ये 33 वर्षं एकटी राहिली. त्यामुळे तिला संधीवात झाला आणि दुखणंही वाढलं. आम्हाला जरी त्रास झाला तरीही जो त्रास अनेक दशकं 'महादेवी'नं सहन केला त्याच्या तुलनेत तो काहीच नाही.

'महादेवी' आता 'राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट' इथं पोहोचली असून तिला तिथं योग्य उपचार मिळतील आणि इतर हत्तींचा सहवासही मिळेल," असं या पत्रकात पुढेही म्हटलं आहे.

SCREEN GRAB

नांदणी इथल्या मठाच्या ट्रस्टला मात्र ही निरिक्षणं मान्य नाहीत. त्यांना घडून आलेल्या एकूण प्रक्रियेबद्दलही शंका आहेत.

"1992 साली हा हत्ती मठात आल्यावर त्याचं कायद्यानुसार रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यानुसार आवश्यक सुविधा तिथं आहे. तसं असतांना या तक्रारीवर एवढ्या वेगात निर्णय आणि कारवाई होते कशी? हे संशयास्पद आहे आणि ते सगळं आम्ही सर्चोच्च न्यायालयातही मांडलं होतं.

प्रश्न हाही आहे की केवळ 'वनतारा'लाच का हा हत्ती देण्यात आला? दुसरी कोणती जागा का सुचवण्यात आली नाही? जामनगरमध्ये या हत्तीला आवश्यक असं वातावरण, सुविधा आहेत का, हे तपासलं का, असे प्रश्न आहेतच," न्यायालयात नांदणीच्या मठाची बाजू मांडणारे ॲडव्होकेट आनंद लांडगे 'बीबीसी मराठी'शी बोलतांना सांगतात.

नांदणीच्या मठाकडून 'राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट'ला या हत्तीणीला हस्तांतरित करण्याची जबाबदारी वनविभागाकडे होती.

"मी न्यायालयाच्या निर्णयावर काही बोलू शकत नाही. उच्च न्यायालयाच्या मूळ आदेशात या हत्तीणीला 'राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट'ला हस्तांतरित करण्याचे आम्हाला आदेश होते.

दोन आठवड्यांची मुदत त्यासाठी होती. त्यानुसार आवश्यकत ते परवाने घेऊन, वाहतुकीची व्यवस्था करुन या हत्तीणीला जामनगर इथं पोहोचवण्यात आलं आहे," असं 'बीबीसी मराठी'शी बोलतांना कोल्हापूर विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितलं.

वनतारामध्ये 'महादेवी'चं आगमन

'महादेवी' हत्तीण वनतारामध्ये सुरक्षितपणे पोहचली असल्याचं वनतारा प्रशासनाकडून सोशल मीडियाद्वारे सांगण्यात आलं आहे.

इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "माधुरी (महादेवी) आता वनतारा येथे सुरक्षितपणे पोहोचली आहे आणि तिथल्या वातावरणात स्थिरस्थावर होत आहे. तिच्या आसपास तिची काळजी घेण्यासाठी, देखभाल करण्यासाठी वनताराचं पशुवैद्यकीय पथक आहे. तिच्यासाठी आवश्यक असणाऱ्या तात्काळ आणि दीर्घकालीन वैद्यकीय गरजांची हे पशुवैद्यकीय पथक काळजी घेत आहे."

vantara 'महादेवी' हत्तीण वनतारामध्ये सुरक्षितपणे पोहचली आहे.

काही कालावधीनंतर, जेव्हा ती त्या वातावरणात स्थिरस्थावर होईल, तेव्हा तिला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि इतर हत्तींच्या सहवासाचा आनंद घेता येईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

ज्यांनी आत्तापर्यंत या हत्तीणीला प्रेम दिलं आणि तिची काळजी घेतली आहे, त्यांना वनतारा प्रशासनाकडून अगदी तशाच पद्धतीनं काळजी घेणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • 'हे' प्राणी, पक्षी आपल्या साथीदाराच्या मृत्यूनंतर रडतात, प्रसंगी जीवही सोडतात
  • तीन दिवसात 10 हत्तींचा मृत्यू, बांधवगड नॅशनल पार्कमधील हत्तींच्या मृत्यूमागे 'कोदो' की आणखी काही?
  • ‘मला हत्तींनी लहानाचं मोठं केलं, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत’
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.