‘पावसाळा’ हा पालकांसाठी त्रासदायक आणि मुलांसाठी आल्हाददायक असतो’, याच्याशी तुम्ही नक्कीच सहमत व्हाल आणि दिवस-रात्र पडणारा मुसळधार पाऊस ही पालकांसाठी डोकेदुखी आणि मुलांसाठी पर्वणी असते. कारण शाळेला सुट्टी तर मिळू शकतेच; पण पावसाचा वेढा पडल्यानं पालक आणि मुलं घरात कैद होतात. अशावेळी नेमकं काय करावं, हे मुलांना बरोबर माहीत असतं. बिचारे पालक मात्र त्यावेळी तीन कारणांमुळे भांबावलेले असतात.
एक : ‘आता अचानक सुटी मिळाल्याने मुलांनी थोडा अधिकचा अभ्यास करावा’ अशी अपेक्षा करणार्या पालकांचा भ्रमनिरास होऊन त्यांना त्रास होतो.
दोन : पालकांनी टि व्ही लावला तर मुले बाजुला येऊन बसणार आणि नाही लावला तर दंगा करणार अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली असल्याने पालक गोंधळतात.
तीन : ‘आता सुटी आहेच तर मुलांनी शांतपणे थोडा अभ्यास करावा. आपण आनंदाने ओटीटी वर एखादा सिनेमा पाहून थोडा आराम करावा’ पालकांचे हे स्वप्न अधुरेच राहिल्याने त्यांची चिडचिड होते.
या आणि अशा परिस्थितीतून सहजी बाहेर पडण्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवा, आपण जे नेहमी करतो त्यापेक्षा एकदम काहीतरी वेगळंच करणं.
याचा एक फायदा म्हणजे मुलांचे दंगा-मस्तीकडे दुर्लक्ष होते. दुसरे म्हणजे, वेगळा विचार करावा लागतो, नवीन आव्हानांना झेलावं लागतं यामुळे मुलं फ्रेश होतात. सर्वांत महत्त्वाचा फायदा, पालक मुलांसोबत हा जो मौल्यवान वेळ खर्च करतात, तेव्हा पालकही मुलांकडून खूप शिकत असतात. या संदर्भातील काही आयडिया सांगून ठेवतो.
तुमच्या घरी ‘साप-शिडी’ खेळाचा तक्ता असेलच. आपण तो नेहमी १ ते १०० या क्रमाने खेळतो. म्हणजे फक्त बेरीजच करत असतो. आज आपण फक्त वजाबाकीच करायची आहे. म्हणून खेळताना सुरुवात १०० पासून करायची आणि १ नंबरच्या घरात पोहोचायचे. यावेळी शिडी मात्र वापरायची नाही, तर फक्त सापच! म्हणून आमच्या मुलांनी याला ‘नागपंचमी’ असं नाव दिलं आहे.
एक मिनिटाचा खेळ : फुगा फुगवायचा. हवेत उडवायचा. फुगा हवेत असेपर्यंत सोबतच्या कागदावर भराभर त्रिकोन काढायचे. फुगा खाली आला तर पुन्हा वर उडवायचा. फुगा जमिनीवर पडला तर आऊट. हा सगळा खेळ एक मिनिटात संपवायचा. मुख्य म्हणजे घरातल्या सर्वांनी खेळायचा. प्रत्येकाला चारवेळा संधी मिळेल. ज्याचे जास्ती त्रिकोन तो जिंकला. हा ‘हवेतले त्रिकोन’ हा खेळ खेळून तर बघा.
बाबा आणि मुलांनी मिळून एक चमचमित पदार्थ तयार करणे. यासाठी आई खुर्चीत बसून ‘दुरून मदत’ करेल. घरात गोष्टीची पुस्तके असतातच. प्रत्येकाने एक गोष्ट वाचून दाखवणे. घरातल्या मोठ्या माणसांनी गेल्या कित्येक वर्षात चित्र काढण्यासाठी हातात पेन्सिल घेतलेली नसते. आणि अमूक एक चित्र काढू, असा विचार ही केलेला नसतो.
म्हणूनच प्रथम पालकांनी मुलांना समोर बसवायचं आणि त्यांचं बघून चित्र काढायचं. नंतर पालकांनी मुलांसमोर बसायचं. मुलं बघून चित्र काढतील. मग ‘चित्रातील नवीन कुटुंब’ ओळखीचं आहे का, ते पाहायचं. शेजाऱ्यांना हे ‘चित्र कुटुंब’ दाखवून चकित करायला हरकत नाही.
खरं तर असं खूप काही सांगता येईल; पण त्यापेक्षा तुम्ही काय काय केलं हे ऐकायला मला अधिक आवडेल.
‘जे पालक आपल्या मुलांमधे मूल होऊन मिसळतात, त्यांची मुले अधीक सर्जनशील असतात’ ही चिनी म्हण लक्षात असू द्या.