Best Tips for Managing Personal Finances and Spending Wisely: कोणत्याही लघुत्तम व्यवसायावर उद्योजकाचे आर्थिक नियंत्रण असणे आवश्यक आहे. यासाठी ‘ब्रेक-इव्हन पॉइंट’ या संकल्पनेचा वापर हा उद्योजकीय कार्यामध्ये केला जातो. ‘ब्रेक-इव्हन पॉइंट’चे लघुरूप आहे ‘बीईपी’. महिला उद्योजकांनी अशा संकल्पना जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘बीईपी’ हा असा नियंत्रण माहिती देणारा बिंदू आहे ज्या ठिकाणी व्यवसायाला नफा किंवा तोटा होत नाही.
म्हणजेच, या बिंदूपर्यंत पोहोचल्यावर व्यवसायाने आपले सर्व खर्च हे विक्री अथवा सेवा पश्चात मिळालेल्या रकमेतून वसूल केलेले असतात. हा बिंदू समजून घेतल्याने आपला व्यवसाय आर्थिकदृष्ट्या कधी स्थिर होईल, याचा अंदाज येऊ शकतो आणि त्यानुसार आपल्या व्यवसायाचे नियोजन करता येते.
‘ब्रेक-इव्हन पॉइंट’ समजून घेण्यासाठी, आपल्याला दोन प्रकारच्या खर्चांची माहिती असणे गरजेचे आहे. स्थिर खर्च (फिक्स्ड कॉस्ट) आणि बदलणारे खर्च (व्हेरिएबल कॉस्ट). स्थिर खर्च म्हणजे असे खर्च जे उत्पादन किंवा विक्रीच्या पातळीवर अवलंबून नसतात, ते नेहमी सारखेच राहतात. उदाहरणार्थ, दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचा निश्चित पगार, यंत्रसामग्रीचा मासिक हप्ता इत्यादी. याउलट, बदलणारे खर्च म्हणजे असे खर्च जे उत्पादनाच्या किंवा विक्रीच्या समप्रमाणात बदलतात. या दोन्ही खर्चांचे योग्य आकलन ‘बीईपी’ काढण्यासाठी मूलभूत आणि महत्त्वाचे आहे.
ब्रेक-इव्हन पॉइंट काढण्याचे सूत्रब्रेक-इव्हन पॉइंट काढण्याचे सूत्र सोपे आहे. एकूण स्थिर खर्च भागिले (प्रति युनिट विक्री किंमत वजा प्रति युनिट बदलणारा खर्च). हे सूत्र वापरून, आपल्याला किती युनिट्स विकावी लागतील किंवा किती उलाढाल करावी लागेल, हे कळते- जेणेकरून सर्व खर्च भरून निघतील व त्यानंतर व्यवसायात फायदा सुरू होईल. ‘बीईपी’ खूप जास्त असेल, तर खर्च कमी करण्याच्या किंवा विक्री किंमत वाढवण्याच्या पर्यायांवर विचार करावा लागतो..
उदाहरणार्थ, एखाद्या उद्योजक-गृहिणीने ‘घरगुती लाडू निर्मिती व विक्री’ हा उद्योग सुरू केला आहे. तिच्या स्थिर खर्चांमध्ये दरमहा गॅस सिलिंडरचा खर्च (समजा ८०० रुपये), मदतनीसाचा पगार (१२०० रुपये) आणि मार्केटिंगसाठी मासिक खर्च (५०० रुपये) असा एकूण २५०० रुपये आहे. एका किलो लाडूसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा (पीठ, गूळ इत्यादी) खर्च २०० रुपये येतो- हा बदलणारा खर्च आहे. महिला उद्योजक एक किलो लाडूची विक्री किंमत ३०० रुपये ठेवते. येथे, प्रति युनिट विक्री किंमत (३०० रुपये) वजा प्रति युनिट बदलणारा खर्च (२०० रुपये) = १०० रुपये. आता, ब्रेक-इव्हन पॉइंट (युनिट्समध्ये) = एकूण स्थिर खर्च (२५०० रुपये) / (प्रति युनिट विक्री किंमत - प्रति युनिट बदलणारा खर्च) (१०० रुपये) = २५०० / १०० = २५ किलो लाडू.
याचा अर्थ, या उद्योजक-गृहिणीला दरमहा किमान २५ किलो लाडू विकावे लागतील, जेणेकरून नफाही होणार नाही आणि तोटाही होणार नाही. २५ किलोपेक्षा जास्त लाडूविक्रीमधून नफा सुरू होतो.
संकल्पना वापराचे फायदे- व्यवसायाच्या आर्थिक नियोजनासाठी ‘बीईपी’ एक महत्त्वाचे साधन आहे. यामुळे किती विक्री झाल्यावर खर्च भरून निघेल, याचा अंदाज येतो.
- तोटा टाळण्यासाठी किमान किती विक्री आवश्यक आहे, हे ‘बीईपी’तून स्पष्ट होते. उत्पादनाची,सेवेची योग्य किंमत ठरवण्यासाठी ‘बीईपी’ मदत करते.
- खर्चांचे सखोल विश्लेषण करण्यास बीइपी हे उद्योजकांना प्रवृत्त करते.
- गुंतवणूकदार किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांना व्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता दाखवण्यासाठी बीइपी अहवाल महत्त्वाचा ठरतो.