मोठी बातमी! बारामतीत विमानाचा अपघात, उड्डाणावेळी चाक निखळले अन्…
Tv9 Marathi August 10, 2025 03:45 AM

बारामतीतून मोठी बातमी समोर आली आहे. बारामती विमानतळावर एक विमानाचा अपघात झाला आहे. आज (शनिवार) सकाळी 7.45 वाजता रेड बर्ड एव्हीएशन या खासगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या विमानाला अपघात झाला. समोर आलेल्या माहितीनुसार विवेक यादव हा प्रशिक्षणार्थी पायलट हे विमान उडवत होता. या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाचा पुढील टायर निखळला आणि अपघात झाला.

विमानाचे चाक निखळले

समोर आलेल्या माहितीनुसार सुरुवातीला या विमानाचे टायर वाकडे झाले आणि नंतर निखळले. त्यामुळे हे विमान टॅक्सी रोड सोडून बाजूच्या गवतात गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ते विमान बाजूला केले आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी हानी झालेली नाही.

एमर्जेसची लँडिंग

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की पायलट विवेक यादव यांनी उड्डाण केले. मात्र थोड्या उंचीवर गेल्याने पुढील चाकात तांत्रिक बिघाड झाल्याने ते निखळले असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांनी एमर्जेसची लँडिंग करण्याचा निर्णय घेतला आणि लँडिंग केले. मात्र यात विमानाच्या पंखांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र रेड बर्ड एव्हीएशनकडून या अपघाताबाबत कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याआधीही या ठिकाणी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदाबादमध्ये भीषण अपघात

अहमदाबादमध्ये जून महिन्यात भीषण विमान अपघात झाला होता. एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही सेकंदांमध्ये एका हॉस्टेलवर कोसळले होते. या अपघातात 265 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश होता. लंडनसाठी निघालेल्या या विमानात 50 पेक्षा अधिक ब्रिटीश नागरिकांनीही आपला जीव गमावला होता. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात होता.

या घटनेनंतर डीजीसीएने विमानांच्या चाचणीबाबत महत्वाचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे बऱ्याच विमानांचे एमर्जेसची लँडिगही करण्यात आले होते. त्यानंतर आता बारामतीत विमान अपघात झाल्याचे समोर आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.