निफाड: जिल्हा बँकेने निफाड साखर कारखाना विक्रीचा डाव आखला असून, जोपर्यंत कामगारांचे ८१ कोटी ९४ लाख रुपये व सभासदांच्या ठेवी मिळत नाहीत, तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही, असा इशारा कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत देण्यात आला. कारखाना शेतकरी, सभासद व कामगारांच्या कष्टाच्या घामातून उभा राहिलेला आहे, त्याला गिळंकृत होऊ देणार नाही, अन्यथा आम्ही सामूहिक आत्महत्या करू व गेटवरच फाशी घेऊ, असा इशाराही कामगार व सभासदांनी या वेळी दिला.
निसाका गेटवर शुक्रवारी (ता. ८) कामगार व सभासदांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. बैठकीत सरचिटणीस बी. जी. पाटील यांनी जिल्हा बँकेला कारखाना विक्री करू न देण्याचा निर्धार व्यक्त केला. कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद गडाख, माजी सरपंच व सभासद प्रतिनिधी खंडू बोडके-पाटील, लहू मोरे, नानासाहेब दाते, गोकूळ झाल्टे, अमित ताजणे, सोमनाथ झाल्टे यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरून निसाका वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. माजी आमदार अनिल कदम यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत सभासद व कामगारांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही दिली.
बैठकीस माजी सरपंच तानाजी पुरकर, खंडू बोडके पाटील, बाळासाहेब बागस्कर, सुभाष जोमन, विजय रसाळ, विष्णुपंत मत्सगार, पुंडलिक ताजणे, शिवाजी मोरे, नितीन निकम, सचिन आढाव, किरण वाघ, केशव झाल्टे, पंढरीनाथ उगले, उत्तम गायकवाड, नानासाहेब बोरस्ते, सीताराम मोरे, विजय रसाळ आदींसह पिंपळस कसबे, सुकेने, मौजे सुकेने, वडाळी शिरसगाव, चांदोरी, सायखेडा, करंजगाव व गोदाकाठच्या गावांमधील सभासद शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ajit Pawar : अतिक्रमणे हटविताच रस्ते रुंदीकरण; हिंजवडी, चाकणमधील स्थितीबाबत उपमुख्यमंत्री पवार यांचा आदेशनिफाड साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असून, भाडेपट्टा कराराची पुनर्रचना करावी. सत्तेचा दुरुपयोग करून निफाड कारखाना गिळंकृत करण्याचा काही महाभागांचा डाव आहे. सभासद व कामगारांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारले जाईल. निफाड कारखाना कुठल्याही परिस्थितीत विक्री करू दिला जाणार नाही, असा निर्धार बैठकीत सभासद व कर्मचाऱ्यांनी केला.
- खंडू बोडके-पाटील, शेतकरी
निफाड कारखान्याच्या मालमत्ता विक्रीला आमचा ठाम विरोध आहे. कामगारांची ८१ कोटी रुपये देणी असताना जिल्हा बँकेने विक्रीचा घाट घातला. हा कारखाना कधीही विक्री करू दिला जाणार नाही. त्यासाठी आम्ही तीव्र जनआंदोलन उभारू.
- प्रमोद गडाख, कार्याध्यक्ष, कामगार संघटना